जळगाव समाचार | ७ ऑगस्ट २०२६
डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी सोनवद येथील माणिकचंद नारायण काबरे विद्यालयात सायबर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुरक्षित वापर, ऑनलाइन फसवणूक टाळण्याचे उपाय आणि डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
स्नेहल पाटील व वैष्णवी पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून ओटीपी फ्रॉड, क्यूआर कोड फ्रॉड, ऑनलाइन बँकिंग फसवणूक, एआय व्हॉइस कॉल फ्रॉड, सोशल मीडिया फसवणूक, बनावट लिंक व फिशिंग यांसह विविध सायबर गुन्ह्यांची माहिती दिली. तसेच मजबूत पासवर्डचा वापर, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA), अनोळखी व्यक्तींना ओटीपी, बँक खाते किंवा वैयक्तिक माहिती न देणे, संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे आणि कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची खातरजमा करणे याबाबत सूचना देण्यात आल्या. सायबर गुन्हा घडल्यास तातडीने संबंधित यंत्रणेकडे तक्रार करण्याचे आवाहनही करण्यात आले. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमास विद्यालयाच्या मुख्याध्यापकांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करताना ऑनलाइन व्यवहारांमध्ये सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात मोबाईल, इंटरनेट व सोशल मीडियाचा सुरक्षित वापर करण्याबाबत मार्गदर्शन मिळाले.

![]()





