विवाहबाह्य संबंधातून 36 वर्षीय महिलेचा खून: आरोपीला अटक…

 

जळगाव समाचार डेस्क| १९ ऑगस्ट २०२४

विवाहबाह्य संबंधातून एका ३६ वर्षीय महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना यवतमाळ येथील राळेगाव शहरात घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ तपास करून गणेश येपारी या आरोपीला अटक केली आहे. हत्या झालेल्या महिलेचे नाव आरती शरद कोवे असून, ती पिंपरी गावातील रहिवासी होती.
यवतमाळच्या राळेगाव शहरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या सोनुर्ली शिवारातील जंगलात आरती कोवे यांचा मृतदेह अर्धवट नग्न अवस्थेत आढळून आला. मृतदेहाच्या आसपास संशयास्पद स्थिती आढळल्याने परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळविले. राळेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला.
महिलेच्या शरीरावर चाकूचे वार असल्याचे आढळून आले, ज्यामुळे खुनाचा संशय बळावला. तिच्या गळ्यावर, पाठीवर, आणि छातीवर वार करण्यात आले होते. या तपासात पोलिसांनी विद्युत गतीने काम करत, आरोपी गणेश येपारी याला ताब्यात घेतले. गणेश येपारी हा राळेगावमधील रहिवासी असून, त्याच्यावर खून आणि अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीला फाशी देण्याची मागणी करत आदिवासी समाज बांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढला. आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी या मोर्चात करण्यात आली.
राळेगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून, या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here