जळगाव समाचार | २६ ऑक्टोबर २०२६
जेवण बनवून न दिल्याच्या कारणावरून मुलाने जन्मदात्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना बोदवड तालुक्यातील येवती येथे उघडकीस आली आहे. अलकाबाई पुरुषोत्तम वाघ (वय ६३) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी त्यांचा मुलगा गणेश वाघ याच्याविरुद्ध बोदवड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलकाबाई वाघ या येवती येथे मुलगा गणेश याच्यासोबत राहत होत्या. रविवारी, २५ ऑक्टोबर रोजी आईने जेवण बनवून न दिल्याच्या कारणावरून गणेश याच्या मनात राग निर्माण झाला. त्यातून झोपेत असलेल्या आईच्या डोक्यावर लोणच्याची बरणी आणि लोखंडी खुरप्याने वार करून त्याने त्यांची हत्या केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
या घटनेमुळे येवती परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संशयित गणेश वाघ याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बोदवड पोलीस करीत आहेत.

![]()







