जळगाव समाचार | ७ जानेवारी २०२६
जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जळगाव शहरात महायुतीच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या रोड शोला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या नागरिकांनी फुलांची उधळण, घोषणाबाजी आणि टाळ्यांच्या गजरात मुख्यमंत्री व महायुतीच्या नेत्यांचे स्वागत केले. या रोड शोमुळे शहरात निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या रोड शोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खासदार स्मिता वाघ, मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार अमोल जावळे यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे नेते आणि जळगाव महानगरपालिका निवडणुकीतील सर्व महायुतीचे उमेदवार सहभागी झाले होते. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. खास सजविलेल्या वाहनावरून नेत्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
रोड शोपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधत जळगाव शहराच्या विकासाचा आढावा मांडला. गेल्या पाच वर्षांत राज्य सरकारच्या निधीतून जळगाव शहरात रस्ते, पायाभूत सुविधा तसेच विविध विकासकामांसाठी शेकडो कोटी रुपयांची कामे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आगामी टप्प्यात पाणीपुरवठा व्यवस्था, उद्याने, अंतर्गत व प्रमुख रस्त्यांचे मजबुतीकरण तसेच औद्योगिक गुंतवणुकीवर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जळगावला विशेष दर्जा देण्यात आल्यामुळे उद्योगांना पोषक वातावरण निर्माण होऊन स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जळगाव महानगरपालिकेवरील संपूर्ण कर्ज राज्य सरकारने यापूर्वीच फेडल्याची माहिती देत, हे राज्यातील दुर्मीळ उदाहरण असल्याचे नमूद केले. पुढील पाच वर्षांत जळगावला विकसित शहरांच्या श्रेणीत आणण्यासाठी आवश्यक निधी राज्य सरकार देईल, अशी घोषणाही त्यांनी केली. या रोड शोद्वारे महायुतीने विकासाच्या मुद्द्यावर प्रचार अधिक तीव्र केल्याचे स्पष्ट झाले असून, जळगाव महापालिका निवडणुकीत महायुती निर्णायक आघाडी मिळवण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

![]()




