जळगाव समाचार | २८ ऑक्टोबर २०२५
चोपडा शहरालगत शिरपूर बाह्यवळण मार्गावर मध्यरात्री पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत रस्ता लुटीच्या तयारीत असलेल्या सात संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दोन गावठी बंदुका, तलवारी, मोबाईल फोन, रोख रक्कम आणि चारचाकी गाडी असा एकूण १३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांना रविवारी मध्यरात्री शिरपूर बाह्यवळण मार्गावर एक पांढऱ्या रंगाची चारचाकी बराच वेळ थांबून असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकासह छापा टाकला असता, रणगाडा चौकाजवळ संशयास्पदरीत्या उभी असलेली चारचाकी दिसली. गाडीच्या बाहेर दोघे आणि आत पाच जण बसलेले होते. पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र, पोलीस पथकाने शिताफीने सर्व सात जणांना पकडले. ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये विक्रम बाळासाहेब बोरगे (२४, रा. वैजापूर जि. संभाजीनगर), दिलीपसिंग हरीसिंग पवार (३२), अनिकेत बालाजी सुर्यवंशी (२५), अमनदिपसिंग अवतारसिंग राठोड (२५), सद्दामहुसेन मोहंमद अमीन (३३, सर्व रा. नांदेड), अक्षय रवींद्र महाले (३०) व जयेश राजेंद्र महाजन (३०, दोन्ही रा. चोपडा) यांचा समावेश आहे.
सर्व संशयितांविरोधात पूर्वी खून, दरोडा, खंडणी, शस्त्र बाळगणे, अपहरण अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. पैकी दोन जण अलीकडेच कारागृहातून सुटले असून काहींवर नांदेड आणि संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचे गुन्हे दाखल आहेत. चोपडा शहर पोलीस ठाण्यात सर्व सात संशयितांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून, ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक निरीक्षक एकनाथ भिसे, हवालदार हर्षल पाटील, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, अजिंक्य माळी, अमोल पवार, मदन पावरा, रविंद्र मेढे, विनोद पाटील, किरण धनगर, योगेश पाटील, प्रकाश ठाकरे यांनी केली.

![]()




