सिंधुदुर्गमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळला; 8 महिन्यांपूर्वीच पंतप्रधानांनी केले होते अनावरण…

 

जळगाव समाचार डेस्क। २६ ऑगस्ट २०२४

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) शौर्याला सलाम म्हणून मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला ३५ फुटांचा पुतळा दुर्दैवाने कोसळला आहे. नौदल दिनानिमित्त ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र, सहा महिन्यांतच हा भव्य पुतळा कोसळल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेने शिवप्रेमी हतबल झाले असून, स्थानिकांनी या घटनेच्या मुळाशी निकृष्ट कामाला दोषी ठरवले आहे. आमदार वैभव नाईक यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत सांगितले की, “शिवरायांच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते. कामाच्या वेळेसच स्थानिकांनी तक्रारी केल्या होत्या, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता हा पुतळा कोसळल्यानंतर मात्र आम्हाला दुखावले गेले आहे.”
नाईक यांनी या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. “४०० वर्षांपूर्वी शिवरायांनी उभारलेला किल्ला आजही भक्कम आहे, परंतु सहा महिन्यांतच पुतळा कोसळला, ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. दोषींवर कारवाई न झाल्यास संपूर्ण राज्यभर आंदोलन करू,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
राजकोट किल्ल्यावर उभारलेला हा पुतळा नौदलाच्या वतीने साकारला गेला होता. या पुतळ्याच्या उभारणीसाठी २ कोटी ४० लाख ७१ हजार रुपये खर्च करण्यात आले होते. पुतळ्याचे शिल्प कल्याण येथील शिल्पकार आणि मालवणचे सुपुत्र जयदीप आपटे यांनी साकारले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि देशातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी उभारण्यात आलेला पुतळा कोसळल्याने सरकारवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
शिवप्रेमींनी आता शांततेत या घटनेचा विरोध करत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here