जळगाव समाचार | १७ ऑक्टोबर २०२५
एरंडोल पोलिस ठाण्यातील हवालदार बापू लोटन पाटील यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीकडून जप्त दुचाकी सोडवून देण्यासाठी त्यांनी पैशांची मागणी केली होती. या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली असून, “पोलिसांमध्ये माणुसकी उरली आहे की नाही?” असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातात तक्रारदार जखमी झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याची दुचाकी जप्त केली होती. ही दुचाकी परत देण्यासाठी हवालदार बापू लोटन पाटील (रा. म्हसवे, ता. पारोळा) यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. अखेरीस तडजोडीनंतर तीन हजार रुपयांवर व्यवहार ठरला होता.
तक्रारदाराने तत्काळ धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचून एरंडोल हायवे चौफुली येथे कारवाई केली. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून पैसे घेताच हवालदार पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले. संशयिताला पुढील चौकशीसाठी धुळ्याला नेण्यात आले असून, उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

![]()




