भुसावळ येथे महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला २० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक…

जळगाव समाचार डेस्क | २२ जानेवारी २०२५

महावितरण कंपनीच्या नवीन सर्विस कनेक्शनसाठी लाच मागणाऱ्या उपकार्यकारी अभियंता प्रशांत प्रभाकर इंगळे (वय ४६, रा. भुसावळ) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २० हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे भुसावळ शहरातील रहिवासी असून, शासकीय विद्युत ठेकेदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एका खाजगी कंपनीच्या नवीन सर्विस कनेक्शनची क्षमता १०० वॅटवरून २०० वॅटपर्यंत वाढवण्यासाठी प्रस्ताव उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांच्याकडे सादर केला होता. मात्र, हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी इंगळे यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर २० हजार रुपयांवर व्यवहार ठरला.

तक्रारदाराने या प्रकरणाची माहिती जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाला दिली. यानंतर पथकाने बुधवारी, २२ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता सापळा रचला. या कारवाईत अभियंता प्रशांत इंगळे यांना २० हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले.

या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने दिलेल्या या यशस्वी कारवाईमुळे जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रकरणांवर अंकुश लावण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here