जळगाव समाचार | १८ डिसेंबर २०२५
रावेर तालुक्यातील विवरा खुर्द येथील २१ वर्षीय हितेश सुनील पाटील या तरुणाचा मृतदेह बुधवारी (दि. १७) सकाळी भुसावळ येथील तापी नदीच्या पात्रात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. जळगाव येथे डिप्लोमा शिक्षण घेत असलेला हितेश गेल्या चार ते पाच दिवसांपासून बेपत्ता होता. रविवारी (दि. १४) त्याची दुचाकी भुसावळ येथील तापी पुलावर बेवारस अवस्थेत आढळून आली होती. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता होण्याची नोंद करण्यात आली होती. बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास स्थानिक मच्छीमारांना नदीत मृतदेह तरंगताना दिसल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन केले. मात्र, हितेशचा मृत्यू आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. दोषींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेत नातेवाईक व मित्रपरिवाराने निंभोरा पोलीस ठाण्यासमोर मृतदेहासह सुमारे दोन तास ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील तसेच निंभोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी हरिदास बोचरे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर मृतदेह विवरा खुर्द येथे आणून शोकाकुल वातावरणात हितेश पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

![]()




