जळगाव जिल्ह्यात दहावी-बारावी परीक्षा कॉपीमुक्त; ड्रोन व लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे कडक देखरेख

 

जळगाव समाचार | २९ जानेवारी २०२६

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित होणाऱ्या इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त अभियान’ प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यासाठी ड्रोन कॅमेरे, लाईव्ह स्ट्रीमिंग, भरारी पथके व चोख पोलीस बंदोबस्ताच्या माध्यमातून काटेकोर देखरेख ठेवली जाणार आहे. राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत परीक्षा प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व भयमुक्त ठेवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल, पोलीस अधीक्षक श्री. महेश रेड्डी (व्हीसीद्वारे), महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रतिनिधी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य प्रतिनिधी श्रीमती भावसार, सदस्य सचिव शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यंदा इयत्ता १२ वीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत, तर इयत्ता १० वीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान होणार आहे. जळगाव जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी १४७ परीक्षा केंद्रांवर एकूण ५९ हजार ४२० विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, त्यामध्ये ३३ हजार ६५३ मुले व २५ हजार ७६७ मुलींचा समावेश आहे. बारावीच्या परीक्षेसाठी ८२ केंद्रांवर ४८ हजार २३२ विद्यार्थी परीक्षा देणार असून, विज्ञान शाखेचे २६ हजार ८८४, कला शाखेचे १५ हजार ५१४, वाणिज्य शाखेचे ४ हजार ८११ विद्यार्थी आहेत. याशिवाय व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ९७८ तर आयटीआय अभ्यासक्रमासाठी ४५ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत.

कॉपी व अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी संवेदनशील व उपद्रवी परीक्षा केंद्रांवर ड्रोनद्वारे देखरेख ठेवण्यात येणार असून, केंद्राबाहेरील परिसराचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावरील वर्गातील पर्यवेक्षक मोबाईलद्वारे झूम मीटिंगच्या माध्यमातून जिल्हा नियंत्रण कक्षाशी थेट जोडले जाणार आहेत. नाशिक विभागीय मंडळाची ९ भरारी पथके तसेच जिल्हास्तरीय विशेष भरारी व बैठी पथके आकस्मिक तपासणी करतील. गैरप्रकार करणाऱ्यांविरोधात दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच परीक्षा कालावधीत केंद्राच्या ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार असून, अखंडित वीजपुरवठ्याची जबाबदारी महावितरणकडे देण्यात आली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात राहणार असून, विद्यार्थ्यांनी तणावमुक्त व पारदर्शक वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here