जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का… दोन माजी महापौरांसह अनेकांचा भाजपात प्रवेश; भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते मात्र नाराज?

Screenshot

 

जळगाव समाचार | १ नोव्हेंबर २०२५

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना राजकीय हालचालींना वेग आला असून, अनेक जिल्ह्यांत महाविकास आघाडीच्या पायाभूत शक्तींना धक्का देत भाजपने नव्या समीकरणांची बांधणी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेतही सत्तेचा राजकीय खेळ रंगू लागला आहे. काल झालेल्या भव्य कार्यक्रमात महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट) चे ज्येष्ठ नेते व माजी महापौर नितीन लढा, माजी महापौर जयश्रीताई सुनील महाजन, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे महापालिकेतील राजकीय समीकरणात मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत.

सन २०१९ च्या मनपा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता मिळवत महापौरपदावर वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र, पुढील काळात अंतर्गत गटबाजी व नाराजीच्या पार्श्वभूमीवर काही नगरसेवकांनी पक्षविरोधी भूमिक घेतल्याने महाविकास आघाडीस संधी मिळाली आणि जयश्रीताई महाजन महापौर बनल्या. आता पुन्हा एकदा २०२५ च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपने विरोधकांना आपल्या गोटात घेत सत्तेसाठी नव्या रणनितीचा अवलंब केला आहे. या रणनीतीमुळे भाजपचे संख्याबळ तर वाढले असले, तरी पक्षातील अंतर्गत नाराजीचे सूरही उमटू लागले आहेत.

भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची लाट असून, “आम्ही वर्षानुवर्षे पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. मात्र, प्रत्येक निवडणुकीत बाहेरून येणाऱ्या नेत्यांनाच संधी मिळते आणि आम्हाला केवळ प्रचारापुरते वापरले जाते,” अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. “सत्तेसाठी आयात नेते घेतले जातात, पण निष्ठावान कार्यकर्त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष होते. ही नाराजी पुढील निवडणुकीत मतदानातून दिसून येईल,” असे कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे. त्यामुळे जळगाव महानगरपालिकेतील सत्ता समीकरणात नव्या घडामोडींची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here