जळगाव समाचार | ३० डिसेंबर २०२५
भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याच्या निषेधार्थ इच्छुक उमेदवार संगीता पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी जळगाव येथील हॉटेल रॉयल पॅलेस येथे आमदार सुरेश (राजू मामा) भोळे यांना घेराव घातला. यावेळी संगीता पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी आमदार भोळे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रसंगी कुटुंबीय भावनिक झाले असून वातावरण तणावपूर्ण बनले होते.
उमेदवारी नाकारल्यामुळे आपल्यावर प्रचंड मानसिक तणाव आला असून आत्महत्येचे विचारही मनात येत असल्याचे वक्तव्य संगीता पाटील यांनी आमदार भोळे यांच्यासमोर केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे परिसरात खळबळ उडाली. संबंधित प्रभागात नगरसेवक पद रिक्त असताना नागरिकांच्या समस्यांना आम्हीच पुढाकार घेऊन न्याय दिला, घाण पाण्याचा प्रश्न नगरपालिकेत जाऊन सोडवला तसेच लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे भाजपचा प्रचार केला, असे त्यांनी सांगितले. सात वर्षांपासून प्रभागात सातत्याने काम करूनही अचानक इतर व्यक्तींना उमेदवारी देण्यात येत असल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आमच्यासोबत ज्या पद्धतीने चर्चा करता, त्याच पद्धतीने वरिष्ठ नेत्यांशीही आमच्यासाठी बोला आणि गरज पडल्यास आमच्यासाठी भांडणही करा, अशी अपेक्षा संगीता पाटील यांनी आमदार सुरेश भोळे यांच्याकडे व्यक्त केली. यावेळी आमदार भोळे हतबल झाल्याचे चित्र दिसून आले. तसेच, नव्या उमेदवाराकडून पक्षाशी गद्दारी होणार नाही याची काय हमी आहे, असा प्रश्न उपस्थित करत आमच्यावर अन्याय झाल्यास कमळाचा प्रचार करणार नसल्याचा इशाराही संगीता पाटील यांनी दिला.

![]()




