जळगाव समाचार | १ जून २०२६
जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अखेर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा भाजपचे रावेर क्षेत्रप्रमुख नंदकिशोर (नंदू) महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. उमेदवारीबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध नावांची चर्चा सुरू असताना पक्षाने अखेर नंदकिशोर महाजन यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. ते सोमवार, १ जून रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महायुती आणि भाजपमधून संभाव्य उमेदवारांच्या नावांची जोरदार चर्चा रंगली होती. भारतीय जनता पक्षाकडून नंदकिशोर महाजन, उद्योजक नंदू अडवाणी, ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र फडके, डॉ. केतकी पाटील, अमोल शिंदे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर यांच्या नावांचा उमेदवारीसाठी विचार होत असल्याचे बोलले जात होते. भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनीही निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा होती.
दुसरीकडे शिवसेनेकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आणि आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र तथा नगरसेवक सुमीत पाटील यांच्या नावांचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. त्यामुळे उमेदवारीबाबतची उत्सुकता शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिली होती.
अखेर भाजपने संघटनात्मक कामात सक्रिय भूमिका बजावणारे नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. रावेर परिसरासह जिल्ह्यात पक्षविस्तारासाठी त्यांनी सातत्याने काम केल्याचे मानले जाते. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे पक्षातील कार्यकर्त्यांचे मत आहे. तसेच ते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आणि पक्षनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
नंदकिशोर महाजन यांच्या उमेदवारीची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी विविध ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला. आता त्यांच्या उमेदवारीनंतर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीच्या राजकीय हालचालींना वेग येणार असून आगामी काळात कोणती राजकीय समीकरणे आकार घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
![]()






