जिल्ह्यात ११-१८ नोव्हेंबर दरम्यान जनजातीय सेवा सप्ताहाचे आयोजन; विविध उपक्रमांतर्गत शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे पालकमंत्र्यांकडून आवाहन…

 

जळगाव समाचार | १२ नोव्हेंबर २०२६

आदिवासी भागातील मूलभूत सुविधांसाठी साडेबारा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासह रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यांतील सुमारे ७० दुर्गम गावे व पाड्यांना सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान जिल्ह्यात ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’ राबविण्यात येत आहे. या माध्यमातून आदिवासी समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्याचे नियोजन असून, एकही कुटुंब योजनांपासून वंचित राहू नये, असे निर्देश पाटील यांनी प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार, सहप्रकल्प अधिकारी प्रवीण दाभाडे उपस्थित होते.

आदिवासी पाड्यांवरील प्रलंबित पाणीपुरवठा योजनांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून साडेबारा कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यांतील दुर्गम वस्त्यांमध्ये सौरऊर्जेवर आधारित वीजपुरवठा व्यवस्था उभारली जाणार आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा सन्मान केवळ जयंतीपुरता मर्यादित न ठेवता आदिवासी समाजाला शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनीही आदिवासी भागातील सिकलसेल तपासणी, आरोग्य आणि शिक्षणविषयक उपक्रमांना प्राधान्य देण्याची सूचना केली.

जनजातीय गौरव सेवा सप्ताहात १३ नोव्हेंबरला लाभार्थ्यांना योजनांचे वाटप, महिला बचत गटांना मार्गदर्शन, १४ रोजी आदिवासी महापुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता व सांस्कृतिक कार्यक्रम, १५ रोजी भगवान बिरसा मुंडा जयंती आणि गुणवंतांचा सन्मान, १६ रोजी शासकीय कागदपत्रांसाठी विशेष शिबिरे, १७ रोजी आरोग्य तपासणी, तर १८ नोव्हेंबरला रोजगार, कौशल्यविकास व स्वयंरोजगार मार्गदर्शन केले जाणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, आश्रमशाळांमध्ये डिजिटल बोर्ड, अभ्यासिका, सीसीटीव्ही, सौरऊर्जा आणि नवीन इमारतींची कामेही हाती घेण्यात आली आहेत. विज्ञान प्रदर्शनात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रोच्या केंद्रांना भेट देण्याची संधी दिली जात असल्याची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी दिली. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून सप्ताहातील उपक्रम प्रभावीपणे राबवावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

दरम्यान, खासदार संजय राऊत यांच्या राजकीय वक्तव्यांवर भाष्य करताना गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली. राऊत भविष्यकाराप्रमाणे भाकिते करतात; मात्र त्यांचे अंदाज वारंवार चुकतात. त्यामुळे ते ‘फेल हवामानशास्त्रज्ञ’ असल्याचा टोला त्यांनी लगावला. याशिवाय सणासुदीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सकडून होणाऱ्या अवाजवी भाडेवाढीचा मुद्दाही उपस्थित झाला. जिल्ह्यातील सुमारे २०० खासगी बसेसची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० बसेसवर आतापर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. प्रवाशांची आर्थिक लूट रोखण्यासाठी आरटीओ विभागाला कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

रेशन कार्डमधून नावे वगळण्याच्या मुद्द्यावर प्रशासनाने महत्त्वाची माहिती दिली. आयकर विवरणपत्र (आयटीआर) भरल्याच्या निकषामुळे जळगाव जिल्ह्यातील सुमारे ८१ हजार लाभार्थ्यांची नावे रेशन यादीतून कमी झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, बँकेचे कर्ज किंवा व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी आयटीआर दाखल केलेल्या गरीब कुटुंबांनाही अपात्र ठरविण्यात आले आहे का, याची फेरतपासणी केली जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी यादीची छाननी करून अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी आरोग्य विभाग आणि महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. शाळांची नियमित आरोग्य तपासणी, अंगणवाड्यांना भेटी आणि तीव्र व मध्यम कुपोषित बालकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेतून गरोदर व स्तनदा मातांना महिन्यातील २५ दिवस सकस आहार, तर बालकांना अंडी आणि केळी दिली जात आहेत. पोषण पुनर्वसन केंद्रांमधील उपचारांमुळे तीव्र कुपोषित बालकांच्या संख्येत घट झाल्याचे प्रशासनाने सांगितले. शहरातील चार माळी परिसरातील पाणी आणि वीज समस्येवरही पालकमंत्र्यांनी भूमिका मांडली. या भागासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, वीजपुरवठा पूर्ववत केल्याचे त्यांनी सांगितले. पाणीटंचाई दूर करण्यासाठीही उपाययोजना सुरू असल्याचे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here