बदलापूर प्रकरणी खळबळजनक खुलासा; आरोपी तब्बल 15 दिवसांपासून करीत होता अल्पवयीन मुलींवर अत्याचार…

 

जळगाव समाचार डेस्क| २४ ऑगस्ट २०२४

 

बदलापूरमधील दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. महाराष्ट्रात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्रभर निदर्शने आयोजित केली आहेत. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे, ज्यात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.
समितीच्या प्राथमिक निष्कर्षानुसार, बदलापूरमधील या अल्पवयीन मुलींवर गेल्या 15 दिवसांपासून अत्याचार होत होते. अहवालानुसार, पीडित मुलीच्या गुप्तांगाला जवळपास एक इंचाची इजा झाल्याचे आढळले आहे. तसेच, या कालावधीत या मुलींवर वारंवार लैंगिक अत्याचार झाले असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अहवालातील महत्त्वाच्या बाबी:
1) आरोपी अक्षय शिंदे हा 1 ऑगस्ट रोजी शाळेत कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झाला होता. मात्र, त्याची पार्श्वभूमी न तपासता त्याची भरती करण्यात आली होती.
2) शाळेच्या आवारात कोणत्याही ओळखपत्राशिवाय त्याला मुक्तपणे वावरता येत होते.
3) त्याची नियुक्ती कोणाच्या शिफारशीने किंवा आउटसोर्स एजन्सीद्वारे करण्यात आली होती, याचा शोध घेण्याची गरज आहे.
4) बाल हक्क आयोगाने या प्रकरणातील अपयशाचा तपास करण्यासाठी शाळा प्रशासनाला प्रश्नांचा संच पाठवला असून, येत्या सात दिवसांत त्यांची उत्तरे मागवली आहेत.
5) शाळा प्रशासन तब्बल 48 तास तक्रारीवर शांत बसल्याचे निष्पन्न झाले असून, तक्रारीनंतरही पालकांची भेट घेण्यात आलेली नाही.
6) पीडितेला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यासाठी तब्बल 12 तास लागले.
बदलापूरमध्ये काही दिवसांपूर्वी एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर संपूर्ण बदलापूरमधील नागरिक आक्रमक झाले होते. त्यांनी शाळेबाहेर आंदोलन केले तसेच काही आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे रोखून धरली होती. सकाळी सुरू झालेले हे आंदोलन संध्याकाळपर्यंत सुरू होते. या प्रकरणातील आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.
या दुर्दैवी घटनेने समाजमन हेलावून गेले आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकारने तात्काळ पावले उचलावीत, अशी जनतेची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here