जळगाव समाचार | १६ नोव्हेंबर २०२५
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त नागपूरमध्ये आज राज्यस्तरीय जनजाती गौरव दिवस भव्य उत्साहात साजरा करण्यात आला. सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवणाऱ्या आदिवासी नृत्यस्पर्धा, लघुचित्रपट व डॉक्युमेंट्री स्पर्धा आणि विविध कलाकृतींनी कार्यक्रमाला विशेष उर्जा मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटन सोहळ्यास आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीने अधिक भव्यता प्राप्त झाली. राज्यभरातून आलेल्या कलावंत, विद्यार्थी आणि आदिवासी समाजातील प्रतिनिधींनी आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा गर्वाने सादर करत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकतेचे प्रभावी चित्र उभे केले.
लघुचित्रपट स्पर्धेत मात्र खान्देशातील कलावंतांनी खऱ्या अर्थाने राज्याचे लक्ष वेधून घेतले. अवघ्या महाराष्ट्रातून आलेल्या सुमारे ३०० स्पर्धकांना मागे टाकत ‘आदिवासी आणि निसर्ग’ या विषयावर आधारित लघुपटाने प्रथम क्रमांक पटकावला. या लघुपटाचे कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका हे सर्वच जबाबदाऱ्या प्रदीप चुडामन भोई यांनी सामर्थ्याने पार पाडत आदिवासी जीवनातील निसर्गनिष्ठ वास्तव प्रभावीपणे उभे केले. महिला मुख्य भूमिकेत शीतल नितीन नेवे यांनी पत्रकाराची भूमिका अचूकपणे साकारली; तर सचिन सोनवणे आणि चिंचपाडा गावातील स्थानिक आदिवासी कलाकारांनीही कथानकाला दमदार आधार दिला. चित्रीकरण आणि संकलनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या दीप्तेश सोनवणे यांनी सातपुडा पर्वतरांगांची नैसर्गिक शोभा आणि चोपड्यातील चिंचपाडा गावातील लोकेशन्स अप्रतिमपणे टिपत लघुपटाला विशेष देखणेपण दिले.

![]()




