जळगाव समाचार | ४ सप्टेंबर २०२५
मध्यप्रदेशातून चोरट्या मार्गाने महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जात असलेला तब्बल ७७ लाख रुपयांचा गुटखा बुधवारी मुक्ताईनगर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. मध्यप्रदेश–महाराष्ट्र सीमेवरील पुरनाड फाटा येथे पोलिसांनी नाकाबंदी केली असता संशयित मालवाहू वाहन भरधाव वेगाने पळवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, अखेर सारोळा फाटा येथे वाहनाला गाठून ताब्यात घेण्यात आले.
वाहनाची झडती घेतल्यावर आतमध्ये पोतड्यांमध्ये भरलेला गुटखा आढळला. पोलिसांनी ७७ लाखांचा गुटखा, २५ लाखांचे मालवाहू वाहन आणि १२ हजारांचा भ्रमणध्वनी असा एकूण १ कोटी २ लाख ३३ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत वाहन चालक आशिष जयस्वाल (रा. देवास, मध्यप्रदेश) याला अटक करण्यात आली असून वाहन मालक आशिक खान (रा. नागपूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात गुटखा निर्मिती, साठवणूक व वाहतूक यावर बंदी असून त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राहुल गायकवाड, मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आशिष अडसूळ, उपनिरीक्षक जयेश पाटील, तसेच सोपान गोरे, सलीम तडवी, छगन तायडे, रतन गीते, मयूर निकम, भरत पाटील, देश पाटील, भाऊराव घेते, राकेश धनगर आणि संदीप धनगर यांच्या पथकाने केली. जळगाव जिल्ह्यात गुटखा व तंबाखू विक्रीवर बंदी असली तरी गावागावांत व शाळा–महाविद्यालयांच्या परिसरातही विक्री सुरू असल्याने पोलीस प्रशासनाकडून धडक मोहीम हाती घेतली जाणार का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

![]()




