जळगाव समाचार डेस्क | ६ नोव्हेंबर २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन नर्मदा रिसॉर्ट येथे करण्यात आले. यावेळी खासदार स्मिता वाघ यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करत, गेल्या दीड वर्षात मंत्री अनिल पाटलांच्या प्रयत्नांतून मतदारसंघात झालेल्या प्रगतीबाबत चर्चा केली. “पन्नास वर्षांत झाले नाही एवढी कामे आम्ही अल्पकाळात केली आहेत, आता तुमच्यावर अवलंबून आहे की हा मतदारसंघ कुठल्या दिशेने जायला हवा,” असे त्यांनी मतदारांना आवाहन केले.
आपल्या मतदारसंघात जाती-जातीचे राजकारण सुरु असल्याकडे लक्ष वेधत वाघ म्हणाल्या, “जातिवादाचे राजकारण थांबले पाहिजे. मलाही धमक्या येतात, पण आम्ही मेलेल्या आईचे दूध प्यालेलो नाहीत, धमक्या देणाऱ्यांनी समोर येऊन दाखवावे, माझ्यासोबत हजारो कार्यकर्ते उभे राहतील,” असे कठोर शब्दांत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
स्मिता वाघ यांनी यावेळी पाच वर्षांपूर्वीची परिस्थिती सांगत, “दर पावलावर मद्याचे विक्री चालायची आणि यात अनेक तरुणांचा बळी गेला आहे. आमचा प्रयत्न आहे की रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी औद्योगिक दृष्टिकोनातून मोठी MIDC आणावी. त्यासाठी पाडळसरे धरणाचे पाणी आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
कार्यक्रमात मंत्री अनिल पाटील यांनी आपले विचार मांडताना, “आम्ही जातीभेदाच्या बाहेर जाऊन विकासावर भर देतोय. तरुण वर्गाला चुकीच्या मार्गावर नेण्यासाठी काही जण मद्यप्राशनाचे संस्कार देत आहेत, पण आम्ही ही संस्कृती मानत नाही. आमच्या तालुक्याने दाखवून दिले आहे की, भूमिपुत्र हाच आमचा जातीधर्म आहे,” असे स्पष्ट केले.
मंत्री पाटील यांनी शहरातील दर्जेदार रस्ते, पायाभूत सुविधा, शेती सिंचन प्रकल्प, आणि सामाजिक विकासात केलेल्या कामांचा आढावा घेतला. “नवीन प्रशासकीय इमारत, अत्याधुनिक बस स्टँड, पंचायत समितीची इमारत, ग्रामीण रुग्णालयाचा उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा, शहरातील DP रस्ते, १९७ कोटींची पाणीपुरवठा योजना, ११० कोटींची शेतीसाठी पाणीपुरवठा योजना, बोरी आणि पांझरा येथे बंधारे अशा महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे,” असे त्यांनी सांगितले.
पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री पाटील यांनी दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रक्रियेबाबत विरोधकांवर टीका केली. “मी अमळनेर तालुक्यासाठी पीक विमा, अनुदान आणि इतर योजनांच्या माध्यमातून साडेसहाशे कोटी रुपयांची मदत मिळवली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“माजी आमदार साहेबराव पाटलांचा गेम केल्याचा आरोप आमच्यावर केला जातो, पण साहेबराव पाटील हुशार माणूस आहेत. निवडणुकीत कोणाचा गेम करतील, हे सांगता येणार नाही,” असे मंत्री पाटील यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. तसेच, माजी आमदार शिरीष चौधरी यांचे भाजपशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमात मंत्री अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष विजय पाटील, शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश पवार, शहराध्यक्ष संजय पाटील, भाजपा माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी जि.प सदस्य जयश्री पाटील, बाजार समिती सभापती अशोक पाटील, ऍड. व्ही आर पाटील, महेंद्र बोरसे, प्रा. सुरेश पाटील, प्रा. मंदाकिनी भामरे, आशा चावरीया यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करताना मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासावर भर देत विविध सामाजिक व औद्योगिक प्रकल्प राबवण्याचे आश्वासन देण्यात आले.