जळगाव समाचार | १७ डिसेंबर २०२५
राज्याचे क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असलेली शासकीय सदनिका लाटल्याप्रकरणी ठोठावण्यात आलेली प्रत्येकी दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाचा निकाल अबाधित राहिला असून, कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपद दोन्ही धोक्यात आले आहेत. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीची शिक्षा कायम राहिल्यास संबंधित आमदार अपात्र ठरू शकतो.
या प्रकरणात यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने कोकाटे यांना दोषी ठरवत प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. या निकालाविरोधात कोकाटे यांनी सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. अपीलच्या सुनावणीदरम्यान सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करत शिक्षेच्या अंमलबजावणीस तात्पुरती स्थगिती दिली होती. मात्र, आता सत्र न्यायालयाने शिक्षेला दुजोरा दिल्याने कोकाटे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी मंत्री कोकाटे यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. कृषिमंत्री असताना सभागृहात रमी जुगार खेळण्याच्या आरोपांपासून ते शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षा झाल्यापर्यंतचे मुद्दे उपस्थित करत, आता तरी कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार का, असा सवाल त्यांनी महायुती सरकारला विचारला आहे. विरोधकांकडून वाढत्या दबावामुळे सरकारची कोंडी होत असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून कोकाटे यांच्या जागी खान्देशातील एखाद्या आमदाराला मंत्रिपदाची संधी दिली जाण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. जळगाव जिल्ह्यात महायुतीचे आधीच तीन मंत्री असून, अनिल पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्यास ही संख्या चार होईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खान्देशात याचा राजकीय फायदा होऊ शकतो, अशी चर्चा असून, आता उपमुख्यमंत्री अजित पवार काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

![]()




