जळगाव समाचार | ४ मार्च २०२५
महायुती सरकारमधील अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी आज (दि. ३) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता हे पद पुन्हा अजित पवार गटातील नेत्याकडे जाईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांना या पदावर संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
बीड जिल्ह्यातील सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याचा मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी निकटचा संबंध असल्याचे समोर आल्यानंतर भाजपसह विरोधकांनी त्यांचा राजीनामा मागितला होता. या पार्श्वभूमीवर, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी धनंजय मुंडे यांनी आपल्या खासगी सचिवामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा पाठवला.
अनिल भाईदास पाटील हे अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते असून, त्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून चांगली कामगिरी केली होती. अमळनेर मतदारसंघातून त्यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. त्यांना मंत्रीपदाऐवजी पक्षाची मोठी जबाबदारी दिली गेली होती. मात्र, आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार गटाकडून त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागेल, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयावर अवलंबून असेल. अनिल भाईदास पाटील यांचे नाव चर्चेत असले तरी अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल.

![]()




