जळगाव समाचार | २ जानेवारी २०२६
अमळनेर नगराध्यक्ष पदग्रहण सोहळ्यात जिल्हा परिषद सदस्या व माजी नगराध्यक्षा जयश्रीताई अनिल पाटील यांच्याविरोधात माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केलेल्या खालच्या थरावरील व आक्षेपार्ह वक्तव्याचा अमळनेर तालुक्याच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.
या निषेधार्थ नगरपरिषद कार्यालयापासून रेस्ट हाऊस चौकापर्यंत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिरीष चौधरी यांच्या पुतळ्यास बांगड्यांचा आहेर देत प्रतीकात्मक पुतळा दहन करून समाजातील विविध घटकांनी आपला संताप व्यक्त केला. मोर्चादरम्यान महिलांच्या सन्मानाच्या घोषणा देत जनभावना प्रखरपणे व्यक्त झाल्या.
या आंदोलनात सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, व्यापारी बांधव, आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह मोठ्या संख्येने महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या. महिलांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा ठाम संदेश या निषेध मोर्चातून अमळनेरकरांनी दिला.
सदर घटनेचा निषेध करताना नागरिकांनी अशा प्रकारच्या वक्तव्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही यावेळी केली.

![]()




