अमळनेर पोलिसांची दमदार कामगिरी ; चोरीच्या २४ मोटारसायकलसह दोघ आरोपींना अटक

 

जळगाव समाचार | १२ नोव्हेंबर २०२५

अमळनेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने केलेल्या कारवाईतून मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन इसमांना अटक करण्यात आली असून तब्बल २४ चोरीच्या मोटारसायकलींसह १५ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव विभाग) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायकराव कोते यांच्या मार्गदर्शनाखाली, तर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

गुन्हे शोध पथकातील पोउपनि शरद काकळीज, पोकॉ प्रशांत पाटील, गणेश पाटील, उज्वलकुमार म्हसके, नितीन मनोरे, उज्वल पाटील आणि हितेश बेहरे यांनी अमळनेर व परिसरातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू केला असता, सीसीटीव्ही फूटेज, तांत्रिक विश्लेषण व डम डाटाच्या आधारे आरोपींचा मागोवा घेण्यात आला. अखेर सातपिंप्री (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील हिमंत रहज्या पावरा आणि अंबालाल भुरट्या खरर्ड या दोघांना धडगाव तालुक्यातील डोंगर-जंगल परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी अमळनेर तसेच इतर ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.

आरोपींच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सातपिंप्री येथील जंगल परिसरातून एकूण २४ मोटारसायकली हस्तगत केल्या. यामध्ये होंडा युनिकॉर्न, होंडा शाईन, बजाज प्लसर, टीव्हीएस रायडर आदी कंपन्यांच्या विविध मॉडेलच्या मोटारसायकलींचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींची एकूण किंमत अंदाजे १५ लाख ६३ हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ काशिनाथ पाटील आणि पोकॉ सागर साळुंखे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here