मुक्ताईनगर येथील शिक्षक कुटुंबाच्या कारला अपघात; पत्नीचा मृत्यू, पती व तीन मुले गंभीर जखमी…

जळगाव समाचार | २५ फेब्रुवारी २०२५

धुळे महामार्गावर भीषण अपघात झाला असून, शिर्डीहून साईबाबांचे दर्शन करून मुक्ताईनगरला परतणाऱ्या शिक्षक कुटुंबाच्या कारला कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, पती व तीन मुले गंभीर जखमी झाली आहेत. हा अपघात रविवारी मध्यरात्री पिंपळकोठा गावाजवळील हॉटेल युपीजवळ झाला.

मुक्ताईनगर येथील शिक्षक राजेश वासुदेव पाटील हे पत्नी रुपाली पाटील (वय ४०) आणि तीन मुलांसह शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर ते आपल्या कारने (MH 19 CQ 7009) परत येत असताना, पिंपळकोठा गावाजवळील हॉटेल युपीच्या जवळ त्यांच्या कारला मागून येणाऱ्या कंटेनरने (WB 23 F 9472) जोरदार धडक दिली. या धडकेमुळे कार थेट डिव्हायडरवर जाऊन आदळली.

या अपघातात रुपाली पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर पती राजेश पाटील आणि त्यांची तीन मुले खुशी, स्वरा आणि गुरु गंभीर जखमी झाले. महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी तसेच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत केली आणि जखमींना एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तीनही मुलांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांच्यावर कल्पना हॉस्पिटल, एरंडोल येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, राजेश पाटील यांच्या तक्रारीवरून कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार काशिनाथ पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

शिर्डीहून दर्शन घेऊन परतणाऱ्या या कुटुंबावर अचानक दु:खाचा डोंगर कोसळला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here