जळगाव समाचार | १६ मार्च २०२६
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे जिल्हा व सत्र न्यायालय तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींना वेग आला असताना आता पाचोऱ्यातही न्यायिक व प्रशासकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा मुद्दा पुढे आला आहे. पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय तसेच न्यायालय स्थापन करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला असून यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात या विषयाची चर्चा सुरू झाली आहे.
पाचोरा येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार किशोर पाटील यांनी या प्रस्तावाबाबत सविस्तर माहिती दिली. पाचोरा व परिसरातील नागरिकांना विविध प्रशासकीय आणि न्यायालयीन कामांसाठी जळगाव येथील जिल्हा मुख्यालयात वारंवार जावे लागत असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात वेळ आणि खर्चाचा त्रास सहन करावा लागतो. विशेषतः भडगाव, एरंडोल आणि पारोळा या तालुक्यांतील नागरिकांना देखील जळगावला जावे लागते. त्यामुळे पाचोरा येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाल्यास या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
पाचोरा शहर भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी असून ते भडगाव, एरंडोल आणि पारोळा या तालुक्यांच्या मध्यवर्ती भागात येते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना प्रशासकीय तसेच न्यायालयीन कामांसाठी पाचोरा येथे येणे अधिक सोयीचे ठरेल. सध्या अनेक कामांसाठी जिल्हा मुख्यालयी जळगाव येथे जावे लागत असल्याने नागरिकांचा प्रवासाचा खर्च वाढतो तसेच वेळही मोठ्या प्रमाणात खर्च होतो. पाचोरा येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन झाल्यास नागरिकांचा हा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केला.
न्यायालयीन कामकाजाच्या दृष्टीनेही पाचोरा हे केंद्रस्थानी असल्याने येथे जिल्हा सत्र न्यायालय किंवा त्यासम दर्जाचे न्यायालय स्थापन करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने होत आहे. या मागणीला विविध सामाजिक संस्था, वकील संघटना आणि नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. न्यायालय आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय एकाच ठिकाणी सुरू झाल्यास प्रशासन आणि न्यायव्यवस्थेचे कामकाज अधिक सुलभ होईल, असेही आमदार पाटील यांनी नमूद केले.
पाचोरा येथे या दोन्ही कार्यालयांसाठी आवश्यक जागा उपलब्ध असून त्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला शासनाची मान्यता मिळवण्यासाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच संबंधित विभागांशी चर्चा करून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यास पाचोरा आणि आजूबाजूच्या तालुक्यांतील हजारो नागरिकांना त्याचा मोठा लाभ होईल, असा दावा त्यांनी केला.
या पत्रकार परिषदेला पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, संजय गोहिल, प्रविण ब्राम्हणे, वकील संघाचे ॲड. एस. पी. पाटील, ॲड. सौंदाणे, ॲड. अनुराग काटकर, ॲड. योगेश पाटील, रणसिंग राजपूत तसेच डॉ. अनिल पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. उपस्थित पदाधिकारी आणि मान्यवरांनीही पाचोरा येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याची गरज अधोरेखित करत शासनाने लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

![]()




