जळगाव समाचार | २८ फेब्रुवारी २०२६
चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथे प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादातून विवाहित महिलेची गोळ्या झाडून हत्या करून प्रियकराने स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीती आणि हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे.
अनिता जगदीश पाटील (वय ४०, रा. अकुलखेडा) आणि देवा सुरेश धनगर (वय ४०) अशी मृतांची नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार, अनिता पाटील आणि देवा धनगर यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
शनिवारी सकाळी सुमारे साडेदहाच्या सुमारास देवा धनगर हा अकुलखेडा येथे अनिता पाटील यांच्या घरी आला. वाद वाढल्याने रागाच्या भरात त्याने जवळ बाळगलेल्या गावठी पिस्टलने अनिता पाटील यांच्या डोक्यात गोळी झाडली. गंभीर जखमी झालेल्या अनिता पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर देवा धनगर याने त्याच पिस्टलने स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
ही घटना त्यावेळी उघडकीस आली, जेव्हा अनिता पाटील यांच्या मुलगी शाळेतून घरी परतली. घरात प्रवेश करताच तिने आईसह एका व्यक्तीचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह पाहिले. घाबरलेल्या अवस्थेत तिने आरडाओरडा करत शेजाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना कळविण्यात आले. काही वेळातच परिसरात मोठी गर्दी झाली आणि वातावरण तणावपूर्ण झाले.
घटनास्थळी देवा धनगर यांची दुचाकी आढळून आली असून ती पोलिसांनी जप्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह पुढील तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.
या घटनेमागील नेमके कारण, वापरलेले शस्त्र कुठून आले आणि प्रेमसंबंधातील वादाचे स्वरूप याबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर सावळे करीत आहेत. प्रेमसंबंधातून घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे अकुलखेडा परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

![]()




