नागपूरात अंगणवाडी कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणाचा कळस; चार वर्षांचा मुलगा रात्रभर वर्गातच कोंडला

 

जळगाव समाचार | २० फेब्रुवारी २०२६

नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील बोरकर लेआऊट परिसरात अंगावर शहारे आणणारी घटना घडली. बुधवारी, १८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे चार वर्षांचा चिमुकला खेळता खेळता अंगणवाडीच्या मागील बाजूस असलेल्या दुसऱ्या खोलीत गेला आणि तेथेच झोपून राहिला. संध्याकाळी शाळा सुटताना संबंधित कर्मचाऱ्याने सर्व खोल्यांची तपासणी न करता बाहेरून कुलूप लावल्याने हा चिमुकला रात्रभर अंगणवाडीतच कोंडला गेला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

मुलगा संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने पालकांनी परिसरात शोधाशोध सुरू केली; मात्र काहीच पत्ता लागला नाही. परिसरात अपहरणाच्या चर्चांना उधाण आले. अखेर पालकांनी खापरखेडा पोलीस स्टेशन येथे धाव घेत तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली.

पोलीस उपायुक्त Sandeep Pakhale यांच्या मार्गदर्शनाखाली सात पथके तयार करण्यात आली. रात्रभर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली तसेच जवळील तलाव, नाले आणि मोकळी मैदाने शोधून काढण्यात आली; तरीही मुलाचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर गुरुवारी, १९ फेब्रुवारी रोजी सकाळी पोलीस उपायुक्त संदीप पखाले यांनी स्वतः अंगणवाडीची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आणि बंद असलेले कुलूप उघडण्याचे आदेश दिले.

कुलूप उघडताच मुलगा त्याच खोलीत सुरक्षित अवस्थेत आढळून आला. आपल्या मुलाला पाहताच आईने त्याला मिठी मारत हंबरडा फोडला, तर पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला. या घटनेनंतर पोलिसांनी अंगणवाडी प्रशासनाला कडक इशारा देत शाळा किंवा अंगणवाडी बंद करताना प्रत्येक खोलीची सखोल तपासणी करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. भविष्यात असा हलगर्जीपणा झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here