जळगाव समाचार | १० जानेवारी २०२५
मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील भगतसिंग नगर परिसरात शनिवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास एका घराला भीषण आग लागून दुर्दैवी घटना घडली. या आगीत एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष व एका महिलेचा समावेश असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागली तेव्हा तिन्ही सदस्य घरात गाढ झोपेत होते. आगीमुळे घरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरल्याने त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. धुरामुळे गुदमरून तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
या आगीत संजोग नरेश पावसकर, हर्षदा संजोग पावसकर आणि कुशल संजोग पावसकर यांचा मृत्यू झाला आहे. घराला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबई पोलीस व अग्निशमन दलाकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून मृतांची ओळख व घटनेची सखोल माहिती संकलित केली जात आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी दिली.

![]()




