आजोबांचे स्वप्न साकारण्यासाठी नातवाचा ध्यास ; विकासाचा संकल्प घेऊन पियूष कोल्हे निवडणूकीच्या रिंगणात…

 

जळगाव समाचार | २७ डिसेंबर २०२५

जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची घोषणा होताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून, सर्वच प्रमुख पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. विविध प्रभागांत इच्छुक उमेदवार आपली दावेदारी मजबूत करण्यासाठी जनसंपर्क, बैठकांद्वारे सक्रिय झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) व भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची युती जाहीर झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) व काँग्रेसने मात्र अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

अशा राजकीय घडामोडींच्या दरम्यान, शहरातील प्रतिष्ठित व राजकीय वारसा लाभलेल्या कुटुंबातील युवा नेतृत्व पुढे येताना दिसत आहे. दादासो पंडितराव कोल्हे यांचे पणतू, माजी नगराध्यक्ष विजयबापू कोल्हे व सिंधुताई कोल्हे यांचे नातू व माजी महापौर ललितभाऊ कोल्हे यांचे चिरंजीव पियूष कोल्हे हे यंदा आपल्या आजोबांच्या पारंपरिक प्रभागातून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पियूष कोल्हे यांनी याबाबत आपली महत्वाकांक्षा व्यक्त केली असून, त्यांना शिवसेनेकडून (शिंदे गट) उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

पियूष कोल्हे यांनी गेल्या काही काळापासून प्रभागात सक्रिय जनसंपर्क वाढवला असून, नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासाच्या गरजा समजून घेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण व आरोग्य या सर्व घटकांचा समतोल विकास साधण्याचा आपला स्पष्ट ‘व्हिजन’ असल्याचे त्यांनी सांगितले.

“आजोबांनी प्रभागासाठी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी आणि त्यांच्या वारशाला नवा अर्थ देत जनसेवेत स्वतःला झोकून देण्यासाठी मी सज्ज आहे. केवळ राजकीय वारसा नव्हे, तर विकासात्मक कामांच्या जोरावर जनतेचा विश्वास मिळवणे हेच माझे उद्दिष्ट आहे,” असे ठाम मत पियूष कोल्हे यांनी व्यक्त केले.

शांत, अभ्यासू व लोकांमध्ये सहज मिसळणारे युवा नेतृत्व म्हणून पियूष कोल्हे यांची ओळख निर्माण होत असून, त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभागात नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. विकासाभिमुख भूमिका, स्वच्छ प्रतिमा आणि स्पष्ट दृष्टीकोन यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत पियूष कोल्हे हे लक्षवेधी उमेदवार ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here