शाळेत गेट टू गेदर आटोपून परतताना अयोध्यानगरात महिलेची सोन्याची पोत लुटली; एमआयडीसी पोलिसात गुन्हा

 

जळगाव समाचार | १९ नोव्हेंबर २०२५

अयोध्यानगर परिसरात गेट-टु-गेदर कार्यक्रमाहून घरी परतत असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दोन चोरट्यांनी जबरीने लुटल्याची घटना रविवार दि १६ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. अनिता अरुण ढाके (वय ४८, रा. अयोध्यानगर) यांच्या गळ्यातील ८ ग्रॅमची पोत आणि १० ग्रॅमची सोन्याची चैन असा एकूण ९० हजारांचा ऐवज चोरट्यांनी घेऊन पलायन केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिता ढाके या १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयातील गेट-टु-गेदर कार्यक्रम आटोपून दुचाकीने घरी परतत होत्या. अयोध्यानगरातील संजीवनी अपार्टमेंटजवळ त्या गाडीवरून उतरत असताना मोपेडवरून आलेल्या दोन इसमांनी त्यांना लक्ष्य केले. त्यापैकी एकाने दुचाकी काही अंतरावर थांबवली, तर दुसरा पायी चालत अनिता ढाके यांच्या दिशेने गेला.

यावेळी चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ४० हजारांची ८ ग्रॅमची पोत आणि ५० हजारांची १० ग्रॅमची सोन्याची चैन अशा दोन्ही दागिन्यांना झडप घालून जबरीने ओढले. चोरी केल्यानंतर आरोपी दुचाकीकडे धावत जाऊन साथीदारासह पसार झाला. महिलेने आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत चोरटे घटनास्थळावरून निघून गेले होते.

एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here