जळगाव समाचार | १७ फेब्रुवारी २०२५
भुसावळ शहरातील डी. एस. हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक आणि नारायण नगरातील रहिवासी रोहिदास धना सोनवणे (वय ५८) यांनी पोटाच्या आजाराला कंटाळून तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. शनिवारी दुपारी १.३० वाजता हा प्रकार घडला. त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आजारामुळे आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
शनिवारी दुपारी त्यांनी तापी पुलावर दुचाकी (एम.एच.१९ डी.टी. ३२४४) लावली आणि थेट कठड्यावरून उडी घेतली. दुर्दैवाने, ते थेट खडकावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना पाहून नागरिकांनी शहर पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. उपनिरीक्षक अनिल सुरवाडे आणि भूषण चौधरी यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आत्महत्येची बातमी कळताच अनेक शिक्षक आणि सहकारी रुग्णालयात दाखल झाले.
आर. डी. सोनवणे हे मनमिळावू स्वभावाचे होते. कोळी समाजाचे सक्रिय पदाधिकारी म्हणून त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला होता. त्यांना संगीताचीही विशेष आवड होती. त्यांनी चार वर्षांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.
त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे. पत्नी यावल तालुक्यातील आमोदा जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत, तर मुलीने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्यावर शनिवारी संध्याकाळी त्यांच्या मूळगावी बामणोद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.