जळगाव समाचार डेस्क;
शिक्षकी पेशाला लाजवेल अशी घटना आज एरंडोल तालुक्यातून समोर आली आहे. आपल्याच शाळेतील शिपाई पदावर काम करणाऱ्या सहकाऱ्यालाच लाच मागितल्या प्रकरणी मुख्याध्यापकाला जळगाव एसीबीकडून (ANTI-CORRUPTION BUREAU) अटक करण्यात आली आहे. थकीत वेतनातील फरकाची रक्कम मंजूर करण्याच्या मोबदल्यात १० हजाराची लाच स्वीकारताना आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली. संदीप प्रभाकर महाजन (४४), रा. नेपाने ता. एरंडोल असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे. (Bribe)
याबाबत सविस्तर वृत्त असे की, एरंडोल तालुक्यातील निपाणेतील श्री संत हरिहर हायस्कूलमध्ये तक्रारदार शिपाई पदावर कार्यरत आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे वेतनातील फरकाची रक्कम २ लाख ५३ हजार ६७० रुपये मंजूर करण्याचा प्रस्ताव त्यांनी जळगाव माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षकांकडे पाठवला होता. दरम्यान हा प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी त्यांच्या शाळेचेच मुख्याध्यापक संदीप महाजन यांनी मंजूर रकमेच्या ५% म्हणजे १२,५०० रुपयांची लाचेची मागणी केली.
दरम्यान तडजोडी यांची १० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव येथील विभागाला तक्रार दिली. पथकाने यानुसार सापळा रचून गुरुवारी २७ जून रोजी दुपारी सदर मुख्याध्यापकास १० हजाराची रक्कम लाच स्वरुपात स्वीकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी कासोदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पीएसआय दिनेशसिंग पाटील, पोलीस नाईक बाळू मराठे आदींनी सापळा रचून ही कारवाई केली. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचार्यांचे धाबे दणाणले तर आहे.