जागतिक महापौर परिषदेत जळगावचा सहभाग ; महापौर दीपमाला काळे यांनी घेतले आधुनिक शहर विकासाचे धडे

 

जळगाव समाचार | २५ नोव्हेंबर २०२६

देशातील आणि परदेशातील शहरांच्या सर्वांगीण विकासाची दिशा ठरवण्यासाठी मुंबईत आयोजित ‘थर्ड वर्ल्ड मेयर्स फोरम समिट २०२६’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत जळगाव महापालिकेच्या महापौर दीपमाला मनोज काळे यांनी आपली दमदार उपस्थिती नोंदवली. या जागतिक व्यासपीठावर विविध देशांच्या महापौरांशी विचारांची देवाणघेवाण करतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोलाचे मार्गदर्शनही त्यांना लाभले. या परिषदेतून मिळालेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि नागरी नियोजनाचा उपयोग आगामी काळात जळगाव शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि गतिमान करण्यासाठी केला जाणार आहे.
परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू, मुंबईच्या महापौर रितू तावडे, ‘एआयआयएलएसजी’चे अध्यक्ष रणजीत चव्हाण आणि विविध राज्यांचे मंत्री व परदेशी प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहरी विकासात महापौर व स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व अधोरेखित केले. शहरे ही विकासाची खरी इंजिने असून सक्षम स्थानिक स्वराज्य संस्थांमुळेच विकसित भारताचा पाया भक्कम होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त करत राज्याच्या नागरी परिवर्तनाचा रोडमॅप मांडला.
परिषदेच्या पहिल्याच दिवशी महापौर दीपमाला काळे यांनी नागरी विकासाशी निगडित तीन महत्त्वाच्या सत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. ‘अर्बन इंडिया @ २०४७’ या सत्रात भविष्यातील आधुनिक शहरांच्या उभारणीवर चर्चा झाली, तर ‘मेयर्स राउंड टेबल टॉक’मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसमोरील आव्हाने आणि त्यावरील उपायांवर विचारमंथन करण्यात आले. यासोबतच ‘शहरी कचरा व्यवस्थापन व सर्क्युलर इकॉनॉमी’ या सत्रात तज्ज्ञांनी कचऱ्याच्या पुनर्वापरातून शाश्वत उपाययोजना कशा राबवता येतील, याचे सखोल मार्गदर्शन केले.

“जागतिक स्तरावरील मान्यवर, तज्ज्ञ आणि विविध देशांच्या महापौरांशी संवाद साधून अनेक आधुनिक कार्यपद्धती जाणून घेता आल्या. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मार्गदर्शन आणि या परिषदेतील जागतिक अनुभव जळगाव शहराला अधिक स्वच्छ, सुंदर आणि नियोजनबद्ध बनवण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरतील.”
— दीपमाला मनोज काळे, महापौर, जळगाव महानगरपालिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here