बालप्रेम ही केवळ भावना नव्हे, तर संस्कारक्षम पिढी घडविण्याचा विचार; नेहरूंच्या बालदिन संदेशाची आजही तितकीच प्रासंगिकत…
जळगाव समाचार, बालदिन विशेष लेख | १४ नोव्हेंबर २०२६
मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य आणि त्यांच्या डोळ्यांतील स्वप्नांमध्ये देशाचे भविष्य पाहणारे पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व. बालदिनाच्या निमित्ताने त्यांच्या बालप्रेमाचा आणि बालकांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा घेतलेला हा वेध…
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्यलढ्यातील सक्रिय सहभाग, आधुनिक भारताच्या उभारणीतील योगदान, लोकशाही मूल्यांवरील निष्ठा आणि शिक्षणाविषयीची दूरदृष्टी यामुळे त्यांचे नाव भारतीय इतिहासात आदराने घेतले जाते. मात्र, राजकीय नेतृत्वाच्या पलीकडे त्यांची आणखी एक ओळख जनमानसात कायम राहिली, ती म्हणजे लहान मुलांचे लाडके ‘चाचा नेहरू’. त्यांच्या जन्मदिनी भारतात बालदिन साजरा केला जातो. मुलांशी त्यांचे असलेले नाते हे केवळ औपचारिक प्रेमाचे नव्हते, तर त्यामागे मुलांच्या निरागसतेविषयीची आस्था, त्यांच्या क्षमतेवरील विश्वास आणि देशाच्या भविष्याविषयीची व्यापक दृष्टी होती. मुलांमध्ये रमणारा, त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधणारा आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणारा नेता म्हणून नेहरूंनी वेगळी ओळख निर्माण केली.
नेहरूंना मुले का आवडत होती, याचे उत्तर त्यांनी स्वतः एका मुलाखतीत दिले होते. १९ ऑक्टोबर १९५८ रोजी रामनारायण चौधरी यांच्याशी झालेल्या संवादात त्यांना मुलांविषयी एवढे प्रेम का वाटते, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नेहरूंनी त्यामागे कोणतेही विशिष्ट कारण सांगता येणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, एक महत्त्वाचे विधान त्यांनी केले, आजची मुले म्हणजे उद्याचा भारत. त्यांची योग्य काळजी घेतली, त्यांना चांगले संस्कार आणि संधी दिल्या, तर देशाचे भविष्यही उज्ज्वल होईल. मुलांना मारहाण करून शिस्त लावण्याच्या पद्धतीला त्यांचा विरोध होता. मुलांकडून चुका झाल्यास त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, पण शारीरिक शिक्षा देऊ नये, अशी त्यांची ठाम भूमिका होती. मुलांना समजून घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा देणे, यावर त्यांचा विश्वास होता.
नेहरू मुलांना केवळ प्रेम देत नव्हते, तर त्यांच्याशी वागतानाही मोठ्यांनी आपला मोठेपणा बाजूला ठेवावा, असे त्यांच्या वर्तनातून दिसून येत असे. मुलांच्या मेळाव्यांना उपस्थित राहणे, त्यांच्याशी गप्पा मारणे, त्यांच्या खेळांचा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेणे, त्यांना प्रोत्साहन देणे, या गोष्टी त्यांच्या स्वभावाचा भाग होत्या. १४ नोव्हेंबर १९५३ रोजी दिल्लीतील राष्ट्रीय स्टेडियमवर मुलांना संबोधित करताना त्यांनी अभ्यास आणि खेळ यांची सांगड घालण्याचा संदेश दिला. शिकणे हे ओझे नसून आनंददायी अनुभव असावा, असे ते म्हणाले. जात, धर्म यांवरून मुलांमध्ये भेदभाव करू नये, सर्व मुलांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे, असा विचारही त्यांनी मांडला. त्यांच्या मते, खेळातून सहकार्य, शिस्त, संघभावना आणि एकमेकांविषयी आदर या मूल्यांची जोपासना होते. मुलांच्या डोळ्यांत त्यांना भारताचे भविष्य दिसत होते.
बालदिन आणि नेहरू यांचे नाते समजून घेताना एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी लागते. १४ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस असल्याने भारतात हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, या दिवसाला स्वतःच्या वाढदिवसाच्या उत्सवाचे स्वरूप मिळू नये, अशी नेहरूंची इच्छा होती. १३ नोव्हेंबर १९५७ रोजी त्यांनी आपल्या खासगी सचिवांना दिलेल्या सूचनेत स्पष्ट केले होते की, त्यांच्या वाढदिवसाचा आणि बालदिनाचा संबंध जोडू नये. १४ नोव्हेंबर १९५७ रोजी राष्ट्रीय स्टेडियमवरील बालदिनाच्या कार्यक्रमात तर त्यांनी मुलांना आवाहन केले की, हा दिवस ‘चाचा नेहरू जिंदाबाद’च्या घोषणांमध्ये न घालवता मुलांचाच दिवस म्हणून साजरा करावा. मुलांनी चांगले वाचावे, लिहावे, खेळावे, नाचावे, गावे आणि आनंदाने जगावे, असा संदेशही त्यांनी दिला. यातून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वापेक्षा मुलांच्या आनंदाला आणि त्यांच्या भवितव्याला अधिक महत्त्व देणारा नेता दिसून येतो.
नेहरूंच्या बालप्रेमाचा विचार करताना त्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनाकडेही पाहणे आवश्यक आहे. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान, परीक्षा आणि गुणांची स्पर्धा नव्हे, तर मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होय, असे त्यांचे मत होते. ३० नोव्हेंबर १९५२ रोजी मुलांना संबोधित करताना त्यांनी मुलांना राष्ट्राची संपत्ती संबोधले होते. प्रत्येक मुलाला वाढण्यासाठी योग्य वातावरण, शिक्षण, प्रशिक्षण आणि संधी मिळाली पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. मुलांच्या विकासाची जबाबदारी केवळ आई-वडिलांची किंवा शाळेची नसून संपूर्ण समाजाची आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले होते. आजच्या काळातही हा विचार तितकाच महत्त्वाचा आहे. बालमजुरी, कुपोषण, शिक्षणातील असमानता, बालकांवरील अत्याचार आणि डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे निर्माण होणारी आव्हाने पाहता मुलांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांच्या भावनिक आणि बौद्धिक विकासाकडे लक्ष देण्याची गरज अधिक तीव्रतेने जाणवते.
खरे तर बालदिन म्हणजे केवळ शाळांमधील सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे, खाऊवाटप किंवा चाचा नेहरूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा दिवस नाही. तो मुलांच्या हक्कांचा, त्यांच्या स्वप्नांचा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करण्याचा दिवस आहे. प्रत्येक मुलाला निर्भयपणे जगता यावे, प्रश्न विचारता यावेत, स्वतःचे मत मांडता यावे आणि आपल्या आवडीचे क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य मिळावे, यासाठी समाजाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. नेहरूंनी मुलांच्या डोळ्यांत उद्याचा भारत पाहिला होता; आता त्या भारताला घडविण्याची जबाबदारी आपली आहे. मुलांना केवळ उद्याचे नागरिक म्हणून पाहण्यापेक्षा आजचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून स्वीकारणे, त्यांच्या भावनांचा आदर करणे आणि त्यांच्या स्वप्नांना बळ देणे, हीच बालदिनाची खरी शिकवण ठरावी. कारण मुलांच्या ओठांवरील हसू टिकवता आले, त्यांच्या हातातील पुस्तक सुरक्षित ठेवता आले आणि त्यांच्या डोळ्यांतील स्वप्नांना दिशा देता आली, तरच आपण चाचा नेहरूंच्या बालप्रेमाचा खरा अर्थ जपला असे म्हणता येईल.

![]()







