जळगाव समाचार | २ नोव्हेंबर २०२६
‘महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत’ महापौर दीपमाला काळे यांनी सोमवार, दि. २ नोव्हेंबर रोजी वॉर्ड क्रमांक १६ मधील जुने जळगाव, ट्रान्सपोर्ट नगर आणि लक्ष्मीनारायण नगर परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात महामार्गालगत साचलेला कचरा, रस्त्यांवरील बांधकाम साहित्य, नाल्यांमधील थर्माकोल व शेवाळ, तसेच सार्वजनिक ओपन स्पेसमध्ये उभी केलेली वाहने आणि अतिक्रमणे निदर्शनास आली. यावर महापौरांनी संबंधित दुकानदारांसह अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने स्वच्छता आणि अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले. जुने जळगाव येथील विठ्ठल मंदिर परिसरात पाणीपुरवठ्याच्या नळांच्या तोट्या तपासण्यासह अपूर्ण अमृत योजनेची नळजोडणी त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोल्हे विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोठ्या नाल्यात थर्माकोलचे बॉक्स साचल्याने पोकलँडच्या साहाय्याने नाला स्वच्छ करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
ट्रान्सपोर्ट नगर परिसरात महामार्गालगत कुशनचा कचरा, दुकानांसमोर पडलेल्या वाहनांच्या फुटलेल्या काचा आणि भंगारामुळे निर्माण झालेल्या अस्वच्छतेवर महापौरांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देतानाच परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यास सांगितले. येथील मार्केटमधील सार्वजनिक ओपन स्पेसमध्ये डंपर आणि जुनी वाहने उभी करून जागेवर अतिक्रमण केल्याचे आढळल्यानंतर संबंधित दुकानदारांना वाहने तातडीने हटविण्याचा इशारा देण्यात आला. अन्यथा महापालिकेमार्फत वाहने हटवून जागा मोकळी करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण खपवून घेतले जाणार नसल्याचेही त्यांनी बजावले. सार्वजनिक रस्त्याअभावी नागरिकांसह महिलांना होणाऱ्या गैरसोयींची दखल घेत उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. साई पार्कजवळील नाल्याशेजारी संरक्षण भिंत उभारणे, तसेच ट्रान्सपोर्ट नगरलगत रेड स्वस्तिकच्या रिकाम्या जागेत महापालिकेची कार्यालये उभारण्याच्या शक्यतेची चाचपणी करण्यासही सांगण्यात आले.
लक्ष्मीनारायण नगर परिसरात नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, नाल्यांची नियमित स्वच्छता आणि पथदिव्यांच्या समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना महापौरांनी संबंधित विभागांना दिल्या. या पाहणी दौऱ्यात स्थानिक नगरसेवक डॉ. विश्वनाथ खडके, सुनील खडके, रंजना वानखेडे, वंदना इंगळे, हर्षल मावळे, प्रदीप रोटे, नरेंद्र सोनवणे यांच्यासह आरोग्य विभागप्रमुख समीर बोरोले, अभियंता विजय मराठे तसेच पाणीपुरवठा, बांधकाम व आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

![]()







