धुळखात पडलेली वाहने हटवा, गटारींची सफाई करा; महापौरांचे निर्देश

 

जळगाव समाचार | २४ ऑक्टोबर २०२६

महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत महापौर दीपमाला काळे यांनी शुक्रवारी (दि. २३ ऑक्टोबर) प्रभाग क्रमांक ७ मधील विविध भागांची पाहणी केली. यावेळी गटारींची अस्वच्छता, अतिक्रमणे, रस्त्यांवरील अडथळे आणि पाण्याची नासाडी आढळून आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गणेश कॉलनी चौकातील गुरुदत्त मंदिर परिसरातील रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या बंद टपऱ्या हटविण्यासह गटारींची तातडीने सफाई करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले.

बजरंग बोगदा परिसरात धूळखात पडलेले साहित्य, अतिक्रमणांचे सांगाडे आणि वाढलेले गवत हटविण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. तसेच तीन ठिकाणी बंद अवस्थेत धूळखात पडलेली चारचाकी वाहने आढळल्याने ती हटविण्याचे निर्देश देण्यात आले. काही ठिकाणी गटारींवर अतिक्रमणे झाल्याचेही निदर्शनास आले. याशिवाय पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याचे आढळल्याने संबंधित व्यक्तीला तातडीने नोटीस बजावण्याचे आदेश महापौरांनी दिले. शहर स्वच्छ आणि अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी नियमित कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, गणेश कॉलनी परिसरातील श्रीहरीनगर येथे सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाचीही महापौरांनी नगरसेवक व अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. या पाहणी दौऱ्यात नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, विशाल भोळे, अंकिता पंकज पाटील, आरोग्य विभागप्रमुख समीर बोरोले, बांधकाम विभागाचे विशाल सुर्वे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here