जळगाव समाचार | २ ऑक्टोबर २०२६
स्पीक मेके आणि केसीई सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्रातर्फे आयोजित चारदिवसीय आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे उद्घाटन प्रसिद्ध सतारवादक पद्मश्री उस्ताद शाहीद परवेज खान यांच्या हस्ते मू. जे. महाविद्यालयातील महाकवी कालिदास सभागृहात झाले. उद्घाटनानंतर उस्ताद शाहीद परवेज खान यांनी बालकलावंतांसह सतारवादन सादर केले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
या वेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी रोहन घुगे, खासदार स्मिता वाघ, केसीई सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड. प्रकाश पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य व स्वागताध्यक्ष भालचंद्र पाटील, प्रसिद्ध तबलावादक उन्मेष बॅनर्जी, स्पीक मेकेचे समन्वयक डॉ. सिंपी सिंग आणि केसीई सोसायटीच्या शैक्षणिक संचालक डॉ. मृणालिनी फडणवीस उपस्थित होते. खासदार स्मिता वाघ यांनी मनोगतात युवा पिढीने कलेचे सादरीकरण करण्यासोबतच विविध कलाप्रकारांचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक असून, त्यासाठी अशा सांस्कृतिक परिषदांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. अॅड. प्रकाश पाटील यांनी कला हे सामाजिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाचे माध्यम असल्याचे नमूद केले.
चार दिवस चालणाऱ्या या परिषदेत १३ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांना नामांकित तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच विविध कलावंतांची सादरीकरणे अनुभवता येणार आहेत. गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील एकूण ३१० नोंदणीकृत विद्यार्थी या परिषदेत सहभागी झाले आहेत. परिषदेत नृत्य दालनाला दिवंगत कलावंत पंडित बिरजू महाराज दालन, संगीत दालनाला पंडित पलूसकर-पंडित भातखंडे दालन, तबला वादन दालनाला दिवंगत तबलावादक पंडित झाकीर हुसेन दालन, तर चित्रकला दालनाला चाळीसगाव तालुक्यातील कलावंत केकी मूस यांच्या स्मरणार्थ केकी मूस प्रेरणा कलादालन असे नामकरण करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कान्ह ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी सप्तकलांचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. चित्रकला, शिल्पकला, गायन, वादन, नाट्य आणि अभिनयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी कलावंतांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी रसिका ढेपे यांनी केले, तर आभार डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी मानले. यावेळी केसीई सोसायटीचे व्यवस्थापन परिषद सदस्य, विविध शाखांचे प्राचार्य व प्रमुख, शिक्षक, खान्देशातील कला, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, सहभागी विद्यार्थी तसेच रसिक-श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

![]()






