जळगाव समाचार विशेष |
आकाश जनार्दन बाविस्कर
मुख्य संपादक, जळगाव समाचार
९१३०३४३६५६
मैत्री… त्यातून उमलणारं प्रेम… प्रेमाचं लग्नात रूपांतर… संसार, मुलं, आई-वडील, जबाबदाऱ्या आणि या सगळ्याच्या गर्दीत कुठेतरी हरवून जाणारी ‘दोघांची’ ओळख. कालांतराने पती-पत्नी हे नातं उरतं; मात्र एकमेकांचे मित्र म्हणून जगणं मागे पडतं. आणि मग एका क्षणी मनात प्रश्न उभा राहतो—आपल्यात खरंच प्रेम उरलंय की फक्त सवय?
याच साध्या, पण अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नाला रंगमंचावर भिडणारं नाटक म्हणजे ‘ही दोस्ती तुटायची नाय’.
मानसी आणि शशांक सदावर्ते. लग्नाला तब्बल पंचवीस वर्षे पूर्ण झालेलं एक जोडपं. आयुष्याचा मोठा टप्पा एकत्र पार केल्यानंतर हे जोडपं घटस्फोटासाठी न्यायालयात पोहोचतं. वरवर पाहता आजच्या काळात ही गोष्ट फारशी अनोखी वाटणार नाही. मात्र, ‘पंचवीस वर्षांचा संसार केल्यानंतर एका साध्या-सरळ स्त्रीला अचानक वेगळं व्हावंसं का वाटतं?’ या प्रश्नाचा शोध घेताना नाटकाची खरी खोली समोर येते.
मानसी ही कवी मनाची स्त्री. तिच्या भावविश्वात कविता, संवेदना आणि नात्यांकडे पाहण्याची स्वतःची एक हळवी दृष्टी आहे. लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवशी शशांक तिला तिच्याच कवितांचा संग्रह छापून भेट देतो. एका पत्नीच्या दृष्टीने हा क्षण अत्यंत भावूक करणारा असू शकतो. नवऱ्याने आपल्या मनातील कविता जपल्या, त्या संग्रहाच्या रूपात तिला भेट दिल्या—यापेक्षा सुंदर काय असावं?
पण याच भेटीतून मानसीच्या मनात एक वेगळाच प्रश्न जन्म घेतो—शशांकने हे खरंच मनापासून केलंय का?
भेट सुंदर आहे; पण त्यामागची भावना खरी आहे का? त्याने तिच्या कविता वाचल्या आहेत का? तिच्या मनाला समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? की पंचवीस वर्षांच्या संसारातील एक औपचारिक जबाबदारी म्हणून त्याने हे केलंय?
याच प्रश्नाच्या गर्तेत मानसी हळूहळू स्वतःच्या नात्याकडे पाहू लागते. आणि तिला जाणवते—कदाचित संसार आहे, जबाबदाऱ्या आहेत, एकत्र घालवलेली पंचवीस वर्षे आहेत; पण ‘दोघं’ कुठेतरी हरवले आहेत.
मानसी स्वतःला या नात्यातून वेगळं करण्याचा निर्णय घेते. मात्र तिचा हा निर्णय कोणत्याही एका मोठ्या घटनेतून जन्मलेला नसतो. ना एखादा मोठा विश्वासघात, ना एखादा नाट्यमय प्रसंग. उलट, वर्षानुवर्षे साचत गेलेल्या छोट्या-छोट्या गोष्टी, न बोललेल्या अपेक्षा, हरवलेली मैत्री आणि नात्यात आलेली नीरसता यांचं हे फलित असतं.
न्यायालय या जोडप्याला समुपदेशनासाठी एका तरुण समुपदेशक दाम्पत्याकडे पाठवतं आणि त्यानंतर सुरू होतो तो केवळ घटस्फोटाचा प्रवास राहत नाही. तो होतो पंचवीस वर्षांच्या सहजीवनाचा, आठवणींचा, तक्रारींचा आणि हरवलेल्या प्रेमाचा शोध.
नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे ते प्रेक्षकांना कोणताही उपदेश करत नाही. मानसी आणि शशांकच्या संवादांमधून उलट प्रेक्षक स्वतःच्या आयुष्यात डोकावू लागतो. एखादा संवाद, एखादी सवय, एखादी तक्रार किंवा एखादं मौन—काहीतरी आपल्या घरातलं वाटत राहतं.
प्रेम संपलं की नातं संपतं का? की प्रेमाच्या जागी फक्त सवय उरते?
आणि जर सवयच उरली असेल, तर अशा नात्याला टिकवण्याचा अर्थ तरी काय?
लेखक ओंकार गोखले यांच्या लेखणीतून या प्रश्नांना मिळालेली हाताळणी विशेष उल्लेखनीय आहे. संवादांमध्ये विनोदाची धार आहे, पण त्यामागे भावनांचा खोल प्रवाह आहे. पन्नाशीतल्या जोडप्यांचे रुसवे-फुगवे, एकमेकांविषयीच्या अपेक्षा, उपरोध, तक्रारी आणि जुन्या आठवणी यांचं अत्यंत बारकं चित्रण होतं.
दिग्दर्शक सूरज पारसनीस यांनी या लेखनाला रंगमंचावर जिवंत करताना गती, विनोद आणि भावनिक चढ-उतार यांचा सुंदर मेळ साधला आहे. नाटक गंभीर विषय मांडत असलं तरी ते प्रेक्षकांवर ओझं टाकत नाही. उलट, प्रसंग पुढे सरकत असताना त्यातील तीव्रता नकळत वाढत जाते.
आणि या अनुभवाला सर्वाधिक ताकद मिळते ती सुमीत राघवन आणि चिन्मयी सुमीत यांच्या अभिनयातून. तब्बल चौदा वर्षांनंतर खऱ्या आयुष्यातील ही जोडी रंगमंचावर एकत्र दिसते. त्यांच्या अभिनयातील सहजता इतकी प्रभावी आहे की काही क्षणी प्रेक्षक रंगमंच विसरून त्या घराचा एक भाग बनतो. एकमेकांकडे पाहण्याची पद्धत, राग, उपरोध, हसू, शांतता आणि अचानक दाटून येणारी भावना—सगळंच अत्यंत खरं वाटतं.
त्यांना शुभंकर एकबोटे आणि अमृता बाणे यांची समर्थ साथ लाभते. तरुण समुपदेशक दाम्पत्य आणि पंचवीस वर्षांच्या संसारानंतर नात्याच्या वळणावर उभं असलेलं जोडपं, या दोन पिढ्यांमधील विचारांचा फरक त्यांच्या अभिनयातून प्रभावीपणे समोर येतो.
संगीत, नेपथ्य आणि प्रकाशयोजना नाटकाच्या भावविश्वाला पूरक ठरतात. भडकपणा टाळून प्रसंगांना सूचकतेने मांडण्याची रंगकर्मींची भूमिका विशेष भावते.
खरं तर या नाटकाचा विषय प्रत्येक घराच्या जवळचा आहे. संसार टिकवताना आपण नातं जगतोय की केवळ भूमिका निभावतोय, हा प्रश्न आज अनेकांच्या आयुष्यात कुठेतरी दडलेला आहे.
मानसीचा निर्णय म्हणूनच अस्वस्थ करतो. कारण ती एखाद्या चुकीच्या नात्यात अडकलेली स्त्री नाही; ती एका पंचवीस वर्षांच्या संसारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारी, स्वतःच्या भावनांचा अर्थ शोधणारी स्त्री आहे.
आणि म्हणूनच ‘ही दोस्ती तुटायची नाय’ हे केवळ घटस्फोटाची कथा राहत नाही. हे नाटक प्रेमापेक्षा आधी असलेल्या मैत्रीचा शोध घेतं. नात्यातील नीरसतेच्या मुळाशी जातं आणि प्रेक्षकांना स्वतःच्या नात्यांकडे पुन्हा एकदा पाहायला भाग पाडतं.
पडदा पडतो… प्रसंग संपतात… संवाद थांबतात… पण मानसीच्या मनातला प्रश्न मात्र प्रेक्षकांसोबत घरी जातो—
‘आपण खरंच एकमेकांसोबत आहोत… की फक्त एकाच घरात राहतोय?’
कदाचित याच प्रश्नाचं उत्तर शोधताना प्रेक्षकांना जाणवतं—
नातं तुटण्याआधी प्रेम संपतंच असं नाही; कधी कधी प्रेमावर वर्षानुवर्षांच्या रुसव्यांचा, अहंकाराचा आणि न बोललेल्या शब्दांचा थर साचलेला असतो. तो थर बाजूला करण्याची तयारी असेल, तर प्रेमापेक्षाही जुनी असलेली ‘मैत्री’ पुन्हा सापडू शकते.
आणि म्हणूनच हे नाटक केवळ पाहण्याचा अनुभव राहत नाही; पडदा पडल्यानंतरही मनात सुरू राहणारा, स्वतःच्या नात्यांकडे पाहण्याचा एक अस्वस्थ, पण सुंदर आरसा ठरतो.
![]()






