अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील NICU ला भीषण आग; तीन नवजात बालकांचा मृत्यू

 

जळगाव समाचार | २४ ऑगस्ट २०२६

अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात (NICU) सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण आग लागून तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. या विभागात उपचारासाठी एकूण नऊ बालके दाखल होती. दुर्घटनेनंतर सहा बालकांना तातडीने सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या NICU मध्ये ही दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग भडकली. काही क्षणांत आगीने संपूर्ण कक्षाला वेढा दिला. धुरामुळे आणि आगीत अडकलेल्या बालकांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. NICU मध्ये प्रामुख्याने कमी वजनाची, मुदतपूर्व जन्मलेली किंवा विशेष वैद्यकीय देखरेखीची गरज असलेली नवजात बालके उपचार घेत असतात.

या घटनेनंतर रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आग लागलेल्या व्हेंटिलेटरमध्ये तांत्रिक बिघाड होता का, ते उपकरण कालबाह्य झाले होते का, तसेच अग्निसुरक्षा यंत्रणा कितपत सक्षम होती, याची चौकशी होणे आवश्यक आहे. रुग्णालयापासून अग्निशमन दलाचे कार्यालय किती अंतरावर आहे आणि सूचना मिळाल्यानंतर अग्निशमन बंब घटनास्थळी किती वेळात पोहोचले, याचाही तपास होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, ज्या इमारतीतील NICU मध्ये ही दुर्घटना घडली ती नवीन इमारत असल्याची माहिती आहे. या इमारतीचे लोकार्पण दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यामुळे नव्या इमारतीतील अतिदक्षता विभागात एवढी गंभीर दुर्घटना घडल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तीन कोवळ्या जीवांच्या मृत्यूमुळे पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here