जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह करून शोषण; पतीसह चौघांना अटक

 

जळगाव समाचार | २० ऑगस्ट २०२६

एरंडोल तालुक्यातील आडगाव येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देत तिचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कासोदा पोलिसांनी पती, सासू, सासरे आणि मुलीच्या वडिलांविरुद्ध बालविवाह, बलात्कार, पोक्सो तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. कमलाकर रमेश भील (गायकवाड), दिलीप देवचंद गोकुळ, रमेश कौतिक भील आणि नबाबाई भील या चारही आरोपींना पोलिसांनी २० ऑगस्ट रोजी पहाटे ००:५५ वाजेच्या सुमारास अटक केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडिता (वय १६ वर्ष) अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिच्या वयाची योग्य पडताळणी न करता २० जून २०२५ रोजी तिचा विवाह कमलाकर रमेश भील (गायकवाड) याच्याशी लावण्यात आला. त्यानंतर ती गरोदर राहिली. धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजमध्ये ६ ऑगस्ट २०२६ रोजी तिने बाळाला जन्म दिला. प्रसूतीदरम्यान करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत ती अल्पवयीन असल्याचे समोर आल्यानंतर बालविवाह आणि लैंगिक शोषणाचा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शारदा गोकुळ भावसार यांच्या फिर्यादीवरून कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहितेतील कलम ६४, ६५(२)(i), ६५(२)(m), ३(५), पोक्सो कायदा २०१२ मधील कलम ४(१), ४(२), ६ तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ मधील कलम ९, १० आणि ११ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. आरोपी कमलाकर रमेश भील (गायकवाड) रा. आडगाव, ता. एरंडोल, दिलीप देवचंद गोकुळ रा. भऊर, ता. चाळीसगाव, रमेश कौतिक भील व नबाबाई भील दोघेही रा. आडगाव, ता. एरंडोल यांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत अंकुश पाटील करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here