जळगाव समाचार | ८ ऑगस्ट २०२६
झारखंडमधील १४व्या झारखंड लोकसेवा आयोगाच्या (JPSC) परीक्षेतील कथित अनियमिततेच्या निषेधार्थ आणि परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन १४व्या दिवशीही सुरू आहे. शुक्रवारी (७ ऑगस्ट) ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) कार्यकर्त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ झारखंड विधानसभेवर मोर्चा काढत घेराव आंदोलन केले. यावेळी AISAच्या अध्यक्षा नेहा बोरा यांच्यावर एका तरुणाने शाई फेकल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले असून, तो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी (ABVP) संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.
जेपीएससी आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या (JSSC) परीक्षांमधील कथित अनियमितता, पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मागणीवरून विद्यार्थी आंदोलन करत आहेत. सरकारी संस्थांमार्फत परीक्षा पारदर्शक आणि पद्धतशीरपणे घेण्यात याव्यात, तसेच परीक्षेतील गैरप्रकारांसाठी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. नेहा बोरा यांनी आंदोलनाला पाठिंबा देताना पेपरफुटी किंवा परीक्षेतील अनियमिततेची जबाबदारी केवळ खासगी संस्थांवर ढकलता येणार नसल्याचे सांगितले. अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांशी संबंधित खासगी संस्थांना परीक्षा व्यवस्थेतून दूर करण्याची मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची सरकारची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी सरकारने आवश्यक ती व्यासपीठे उपलब्ध करून दिली असून, प्रत्येक विद्यार्थ्याची समस्या समजून घेण्याची सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळात माजी महाधिवक्त्याचा समावेश करण्यास सरकारने आक्षेप घेतला आहे. सरकार केवळ विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करेल, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे. गुरुवारी रात्री एसडीएम आणि कायदा व सुव्यवस्था विभागातील अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली; मात्र शिष्टमंडळाच्या रचनेवरून मतभेद कायम राहिल्याने सुमारे ४५ मिनिटांची चर्चा निष्फळ ठरली.
दरम्यान, जयपाल सिंह मुंडा स्टेडियममध्ये उपोषण करणाऱ्या राहुल क्रांती यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रांची सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. देवेंद्र नाथ यांच्यासह सहा आंदोलक उपोषणावर असल्याची माहिती आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी गुरुवारी रात्री उपोषणकर्ते विद्यार्थी नेते रवींद्र पासवान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यापूर्वी व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. विद्यार्थ्यांची आंदोलने ही शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधातील आवाज असल्याचे सांगत प्रत्येक सरकारने विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकले पाहिजे, अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली. त्यामुळे जेपीएससी परीक्षेच्या मागणीवरून सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र होत असून, राज्य सरकार आणि आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये चर्चेतून तोडगा निघतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

![]()





