जळगाव समाचार | १६ जुलै २०२६
जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन (JDBA) व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी दुसऱ्या निवड चाचणीचे आयोजन ३१ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. नवी पेठ येथील जे.जे.के.एस.च्या इनडोअर बॅडमिंटन हॉलमध्ये ही स्पर्धा होणार असून जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन व सचिव विनीत जोशी यांनी केले आहे.
स्पर्धेत ९, ११, १३, १५, १७ आणि १९ वर्षांखालील गटांसह खुला व ३५ वर्षांवरील वरिष्ठ गटांचा समावेश करण्यात आला आहे. मुलं-मुली तसेच पुरुष-महिला गटांमध्ये एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा प्रकारातील सामने खेळविण्यात येणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक खेळाडूने ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य असून प्रवेश अर्ज https://forms.gle/ziPsGAxXdyw2cFeH9 गुगल फॉर्मद्वारे स्वीकारले जाणार आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २६ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील प्रवेश केवळ जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंसाठीच मर्यादित राहणार आहे.
स्पर्धेतील सर्व सामने जागतिक बॅडमिंटन महासंघ (BWF) व भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या नियमानुसार खेळविण्यात येणार असून सामने दररोज सकाळी ७ वाजल्यापासून सुरू होतील. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी किशोर सिंह (मो. ९९७०४ १४९५४ / ९४२११ २११०६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

![]()





