जळगाव समाचार | ११ जून २०२६
मुरुडजवळील प्रसिद्ध काशीद बीचवर सोमवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील २५ वर्षीय तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला, तर दुसऱ्या तरुणाचे प्राण लाइफगार्ड आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले.
अमीन मजीद शेख (वय २५), मलिक नजीर शेख (वय २१) आणि इम्रान अन्वर खान (वय ३७, सर्व रा. कासोदा, ता. एरंडोल, जि. जळगाव) हे ताडपत्री विक्रीच्या व्यवसायानिमित्त काशीद-मुरुड परिसरात आले होते. कामातून मोकळा वेळ मिळाल्याने ते काशीद बीचवर फिरण्यासाठी गेले होते.
यावेळी अमीन शेख आणि मलिक शेख हे समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र समुद्रातील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात अडकले. ही बाब लक्षात येताच घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली तसेच मुरुड पोलिसांना माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच मुरुड पोलिसांचे कर्मचारी व लाइफगार्ड यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर मलिक शेख याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र अमीन मजीद शेख याला वाचवता आले नाही. त्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
मृत अमीन शेख याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुरुड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी मुरुड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे कासोदा परिसरात हळहळ व्यक्त होत असून पर्यटनस्थळी समुद्रात उतरताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

![]()




