जळगाव समाचार | ५ जून २०२६
भारतीय कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, कृषी व्यवस्थापन आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (फाली) या उपक्रमामुळे आगामी काळात शेती क्षेत्रात सकारात्मक आणि दीर्घकालीन बदल घडून येतील, असा विश्वास जैन फार्म फ्रेशचे संचालक अथांग जैन यांनी व्यक्त केला. जैन हिल्स येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या बारा वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमातून देशभरातील ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना आधुनिक शेती, कृषी व्यवस्थापन, तंत्रज्ञानाचा वापर आणि कृषी उद्योजकतेचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी फालीच्या उपाध्यक्ष नॅन्सी बेरी, गोदरेजच्या ‘गुड अँड ग्रीन सस्टेनेबिलिटी अँड सीएसआर’ विभागाच्या पाकज्ञान दस्तूर, फालीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शार्बोनी पोदार तसेच जनरल मॅनेजर रोहिणी घाडगे उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनीही उपक्रमाच्या वाटचालीविषयी आणि कृषी क्षेत्रातील त्याच्या योगदानाविषयी मनोगत व्यक्त केले.
अथांग जैन यांनी सांगितले की, बदलत्या कृषी परिस्थितीत तरुण पिढीला शेतीकडे आकर्षित करणे, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे तसेच बाजारपेठेचे ज्ञान आणि शाश्वत शेतीच्या पद्धती शिकविणे ही काळाची गरज बनली आहे. फालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, नवोन्मेषी विचारसरणी आणि कृषी उद्योजकतेची जाणीव विकसित होत असून यामुळे भविष्यात सक्षम कृषी नेतृत्व निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्याचा सकारात्मक परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही होईल, असे त्यांनी नमूद केले.
फाली कार्यक्रमाचा विस्तार सध्या तीन राज्यांमध्ये करण्यात आला असून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण दिले जात आहे. या उपक्रमातून तयार होणारे युवा कृषी नेते आधुनिक आणि शाश्वत शेतीच्या माध्यमातून देशाच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या प्रकल्पास जैन इरिगेशनसह गोदरेज अॅग्रोवेट, युपीएल, स्टार अॅग्री, रॅलीज इंडिया, ओमनिवोअर, प्रॉम्प्ट, एसबीआय फाउंडेशन, अमूल आणि उज्जीवन या संस्था व कंपन्यांचे सहकार्य लाभत आहे.
![]()






