जळगाव समाचार | ५ जून २०२६
पटना येथील कदमकुआं पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या फायरिंग प्रकरणात प्रसिद्ध शिक्षक खान सर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २ जून २०२६ रोजी रात्री घडलेल्या या घटनेनंतर त्यांच्या दोन सुरक्षारक्षकांना अटक करण्यात आली असून, त्यानंतर पटना पोलिसांनी खान सर यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार, चौकशीदरम्यान सुरक्षारक्षकांनी गोळीबार केल्याची कबुली दिली असून तो खान सर यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास काही व्यक्ती संतप्त अवस्थेत कोचिंग संस्थेबाहेर जमा झाल्या होत्या. या जमावाने प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचा तसेच संस्थेचे बॅनर फाडल्याचा आरोप आहे. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याने दोन्ही सुरक्षारक्षक शस्त्रांसह खान सर यांच्यासोबत कार्यालयाबाहेर आले असता मोठा जमाव घोषणाबाजी करत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.
सुरक्षारक्षकांच्या जबाबानुसार, जमाव आक्रमक होत असल्याचे पाहून खान सर आणि त्यांच्यासोबत असलेल्या काही सहकाऱ्यांनी तात्काळ गोळीबार करण्यास सांगितले होते. “काय होईल ते मी पाहून घेईन,” असे सांगण्यात आल्याचा दावा सुरक्षारक्षकांनी चौकशीत केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या जबाबांच्या आधारे तपास यंत्रणांनी प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून विविध बाबींची पडताळणी केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पटना पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हालचाली वेगवान केल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पटना विभागाचे पोलीस महानिरीक्षक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुढील कारवाईची रूपरेषा निश्चित केली आहे. दुसरीकडे, खान सर यांची कायदेशीर टीम वकिलांशी चर्चा करत असून संभाव्य अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामिनासंदर्भात सल्लामसलत सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. विद्यार्थ्यांनी कोणाच्याही भडकावण्याला बळी पडू नये आणि कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पटना पोलिसांनी केले आहे.
![]()






