जळगाव बाजार समितीच्या सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड…

 

जळगाव समाचार | १८ मे २०२६

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदावर अखेर लक्ष्मण गंगाराम पाटील ऊर्फ लकी टेलर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या निवडीमुळे यापूर्वी दोन वेळा सभापतीपद हुलकावणी देणारे लक्ष्मण पाटील अखेर सभापतीपदी विराजमान झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत महायुतीचे स्पष्ट बहुमत असतानाही गेल्या काही महिन्यांपासून सभापतीपदाच्या निवडीवरून राजकीय घडामोडींना वेग आला होता. याआधी शामकांत सोनवणे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर सुनील महाजन यांनी सभापतीपदाची धुरा स्वीकारली होती. मात्र अवघ्या सहा ते सात महिन्यांतच सुनील महाजन यांच्या विरोधात काही संचालकांनी एकत्र येत अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी राजीनामा न देता भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे भूमिका स्पष्ट करण्यासाठी धाव घेतली होती.

दरम्यान, या संपूर्ण घडामोडींनंतर गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी संचालकांची बैठक घेत विविध पर्यायांवर चर्चा केली होती. मात्र सभापतीपदासाठी अंतिम नाव जाहीर करण्यात आले नव्हते. त्यामुळे पुढील सभापती कोण होणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता कायम होती.

सूत्रांच्या माहितीनुसार सभापतीपदासाठी मनोज दयाराम चौधरी, मिलिंद चौधरी आणि लक्ष्मण गंगाराम पाटील ऊर्फ लकी टेलर या नावांची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर सर्व समीकरणांवर पडदा टाकत लक्ष्मण पाटील यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. निवड प्रक्रियेत त्यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली.

निवड जाहीर होताच बाजार समिती परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोष करत नूतन सभापतींचे स्वागत केले. यावेळी आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यासह बाजार समितीचे संचालक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार मंगेश चव्हाण यांनी उर्वरित तीन वर्षांच्या कार्यकाळात तीन सभापती आणि तीन उपसभापती होणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळे आगामी काळात बाजार समितीच्या राजकारणात आणखी बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here