जळगाव समाचार | १८ मे २०२६
महेंद्रसिंह धोनी याच्या आयपीएलमधील भवितव्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना वेग आला असून, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सोमवारी चेपॉक मैदानावर होणारा सामना त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरणार का, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
यंदाच्या आयपीएल मोसमात चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी एकदाही मैदानावर खेळताना दिसलेला नाही. पोटरीच्या दुखापतीमुळे तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याची माहिती मोसमाच्या सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्स व्यवस्थापनाकडून देण्यात आली होती. मात्र, संघाचा घरच्या मैदानावरील अखेरचा सामना जवळ आल्याने धोनीच्या पुनरागमनाबाबत चर्चांना उधाण आले आहे.
चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर होणारा हा सामना आयपीएल २०२६ मधील चेन्नई सुपर किंग्सचा घरच्या मैदानावरील शेवटचा सामना असणार आहे. त्यामुळे धोनी या सामन्यानंतर निवृत्ती जाहीर करणार का, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात धोनीचे २०२१ मधील एक वक्तव्य पुन्हा चर्चेत आले आहे.
चेन्नई सुपर किंग्सच्या एका कार्यक्रमात बोलताना धोनीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीबाबत नियोजनपूर्वक निर्णय घेत असल्याचे सांगितले होते. त्याने आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील अखेरचा सामना रांची येथे खेळल्याचे नमूद करत, आयपीएलमधील शेवटचा टी-२० सामना चेन्नईमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या वक्तव्याला आता पाच वर्षे पूर्ण होत असताना चेन्नईतील हा सामना विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी धोनी नेट्समध्ये सराव करतानाही दिसला. फिजिओच्या मदतीशिवाय त्याने स्वतः सराव आणि व्यायाम केल्याचे समोर आले असून, त्याच्या संभाव्य पुनरागमनाच्या चर्चांनाही त्यामुळे बळ मिळाले आहे.
आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वीपासूनच धोनीच्या निवृत्तीबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. अनेक माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञांनी हा त्याचा अखेरचा मोसम असू शकतो, असे मत व्यक्त केले आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यानेही अलीकडील मुलाखतीत चेन्नईमध्ये होणारा हा सामना धोनीच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली आहे.
![]()






