नीट पेपरफुटीचा विद्यार्थ्यांवर मानसिक आघात; तिघांची आत्महत्या, मास्टरमाइंड पी. व्ही. कुलकर्णी अटकेत

 

जळगाव समाचार | १६ मे २०२६

देशातील लाखो विद्यार्थ्यांनी ३ मे २०२६ रोजी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) दिली होती. मात्र परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप समोर आल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित यंत्रणांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून आता २१ जून रोजी देशभरात पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. दरम्यान, या संपूर्ण घडामोडींमुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातून देशातील तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दिल्लीतील उत्तर-पश्चिम भागातील आदर्श नगर येथे राहणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित विद्यार्थिनीने यंदाच्या परीक्षेत चांगले गुण मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द झाल्याने ती तीव्र मानसिक तणावात गेल्याची माहिती समोर आली आहे. या नैराश्यातूनच तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

याचप्रमाणे राजस्थानातील सिकर येथे राहणाऱ्या २२ वर्षीय विद्यार्थ्यानेही आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित विद्यार्थ्याने यापूर्वी दोन वेळा नीट परीक्षा दिली होती. यंदा चांगले यश मिळेल, असा त्याला विश्वास होता. मात्र परीक्षा रद्द झाल्याने तो मानसिकदृष्ट्या खचल्याची माहिती पोलिस तपासातून समोर येत आहे.

दरम्यान, गोव्यातील १८ वर्षीय विद्यार्थ्यानेही आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आल्याने देशभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग घडलेल्या या घटनांमुळे स्पर्धा परीक्षांमधील तणाव, विद्यार्थ्यांवरील मानसिक दबाव आणि परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दुसरीकडे, नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात केंद्रीय अन्वेषण विभागाला (CBI) मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेल्या पी. व्ही. कुलकर्णी याला सीबीआयने अटक केली आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार कुलकर्णी हा पुण्यात रसायनशास्त्राचा व्याख्याता असून तो नीट परीक्षा २०२६ प्रक्रियेशी संबंधित होता. या प्रकरणात आरोपी असलेल्या मनीषा वाघमारे हिलाही १४ मे रोजी सीबीआयने अटक केली होती. नीट पेपरफुटीचे धागेदोरे देशातील विविध राज्यांपर्यंत पोहोचल्याचे समोर येत असून सीबीआयकडून सखोल तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here