जळगाव समाचार | १२ मे २०२६
लोकांना सोनं खरेदी टाळण्यासह इंधन, खाद्यतेल आणि खतांचा वापर कमी करण्याचे आवाहन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस नेते Rahul Gandhi यांनी जोरदार टीका केली आहे. मोदी सरकार जनतेवर त्यागाची जबाबदारी ढकलत असून, हे आवाहन म्हणजे सरकारच्या अपयशाची कबुली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
पंतप्रधान Narendra Modi यांनी रविवारी नागरिकांना सोन्याची खरेदी टाळावी, परदेश प्रवास कमी करावा, पेट्रोलचा वापर मर्यादित ठेवावा, तसेच मेट्रोचा वापर आणि घरून काम करण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले होते. वाढती आर्थिक आव्हाने आणि आयातीवरील दबाव लक्षात घेऊन हे आवाहन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना सरकारवर निशाणा साधला. “हे उपदेश नसून सरकारच्या अपयशाचे पुरावे आहेत. मागील १२ वर्षांत देश अशा स्थितीत पोहोचला आहे की, नागरिकांनी काय खरेदी करावे, कुठे जावे किंवा काय टाळावे, हे सरकारला सांगावे लागत आहे,” असे त्यांनी म्हटले.
राहुल गांधी यांनी पुढे आरोप केला की, प्रत्येक वेळी सरकार स्वतःची जबाबदारी टाळून सामान्य जनतेवर भार टाकण्याचा प्रयत्न करत आहे. देश चालवण्याची जबाबदारी सक्षम नेतृत्वाकडे नसल्याचा टोला देखील त्यांनी लगावला.
दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे हा मुद्दा अधिकच राजकीय रंग घेत असून, आर्थिक परिस्थिती आणि केंद्र सरकारच्या धोरणांवरून नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत.

![]()




