एअरपोर्ट परिसरातील घरफोडी उघड; आंतरराज्य टोळी अटकेत, मुद्देमाल जप्त

 

जळगाव समाचार | ६ मे २०२६

शहरातील एअरपोर्ट परिसरातील तारा बिझनेस पार्क येथे घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा एमआयडीसी पोलिसांनी यशस्वी उलगडा करत मध्यप्रदेशातील आंतरराज्य टोळीला अटक केली असून सुमारे ११ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. संबंधित प्रकरणात मोईज अब्बाज बोहरा (रुबी कंपनी) यांच्या निवासस्थानी ही चोरी घडली होती.

फिर्यादी मोईज बोहरा हे दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. दिनांक १५ एप्रिल रोजी पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास परतल्यानंतर त्यांच्या घराचा दरवाजा उघडा आढळला. घरात प्रवेश करून पाहणी केली असता चोरी झाल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाचे निर्देश दिले. पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे व चंद्रकांत धनके यांनी घटनास्थळी पाहणी करून तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी मध्यप्रदेशातील पाटी चाचरीचा सेंधवा, खरगोन येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तेथे जाऊन वेशांतर करून संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून निलेश उर्फ भुऱ्या माहेरिया डुडवे (रा. धावडा), ताराचंद पठाण सोलंखी, सायसिंग राकेश सोलंखी, रविंद्र छोटू आर्य, दिलीप मंगा डुडवे व ग्यारशीरालाल मगन अलावे (सर्व रा. चाचरीया पाटी, ता. सेंधवा, जि. बडवानी, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली.

आरोपींकडून ३९ ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत ५ लाख ४७ हजार ५०० रुपये), ९९ ग्रॅम चांदीचे दागिने (२५ हजार रुपये) तसेच ५ लाख ७८ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ११ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके तसेच प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, गिरीश ठाकूर, मोतीलाल बोरसे, विशाल कोळी, रमाकांत साळुंखे, शशिकांत मराठे, नितीन ठाकूर व राहुल घेटे यांच्या पथकाने पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here