जळगाव समाचार | ६ मे २०२६
एरंडोल तालुक्यातील ताडे येथे आयोजित हळदी समारंभात गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या एका युवकाला कासोदा पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून जिवंत काडतूस जप्त केले आहे. या घटनेमुळे समारंभस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव लखन प्रकाश वाघ (रा. पथाडे, ता. पाचोरा) असे असून त्याच्याविरुद्ध अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, ३ मे रोजी रात्री ताडे येथे हळदी समारंभ मोठ्या उत्साहात सुरू असताना, सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास बँडच्या तालावर नृत्य सुरू होते. याच दरम्यान काही उपस्थित नागरिकांच्या निदर्शनास आले की संबंधित युवकाच्या कमरेला गावठी कट्टा लावलेला आहे. नागरिकांनी विचारणा करताच संशयिताने परिस्थितीचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. याबाबतची माहिती तात्काळ कासोदा पोलीस ठाण्याला देण्यात आली.
दरम्यान, ४ मे रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत भातखेडे चौफुली परिसरातून लखन वाघ याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, कॉन्स्टेबल निलेश गायकवाड, योगेश पाटील व सोनू पाटील यांचा समावेश होता.

![]()




